You are currently viewing आंबोलीत मुलींचे सैनिक स्कुल उभारण्यासाठी पाठपुरावा करणार – दीपक केसरकर 

आंबोलीत मुलींचे सैनिक स्कुल उभारण्यासाठी पाठपुरावा करणार – दीपक केसरकर 

विद्यार्थ्यांनी सैनिक होण्यासाठी प्रयत्न करावे

सावंतवाडी

आंबोली येथे मुलींचे सैनिक स्कूल सुरू करण्याची मागणी गेले काही दिवस होत आहे. ते सुरू करण्यासंदर्भात शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा करू, असे आश्वासन आज येथे आयोजित कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सैनिक होण्यासाठी प्रयत्न करावे, परंतु संधी न मिळाल्यास नाव उमेद होऊ नये, जीवनाच्या लढाईत यशस्वी व्हावे, असेही त्यांनी सांगितले. श्री. केसरकर यांनी आज या ठिकाणी सैनिक स्कूलला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी कोल्हापूर नियोजन मंडळाचे सदस्य अमित कामत, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, सैनिक पतसंस्था चेअरमन बाबुराव कविटकर, दिपक राऊळ, जाॅय डान्टस , पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली सैनिक स्कूल शिस्तबद्ध पद्धतीने काम करत आहे. तसेच ब्रिगेडियर सुधीर सावंत सैनिक व माजी सैनिकांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मलाही भेटतात. आंबोली सैनिक स्कूल निवासीमध्ये विद्यार्थी येतात तसेच मुलींसाठी निवासी सैनिक स्कूल सुरू करण्याची मागणी केली जात आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला कार्यरत आहेत. त्यामुळे तोही प्राधान्याने विचार केला जाईल असे त्यांनी सांगितले.
केसरकर म्हणाले, देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकांच्या प्रति प्रत्येकाच्या मनात आदरभाव आहे. सैनिक शाळेत शिस्त, कवायती, खेळ अशा व्यक्तीमत्व विकास साधणाऱ्या विविध प्रकारच्या शिक्षणाला गती देण्याचा प्रयत्न केला जातो. सर्वच मुले शिक्षण घेतल्यानंतर सैन्यात जातील असे नाही पण जीवनाला दिशा, उर्जा मिळते. देशाचा यशस्वी सशक्त नागरिक बनून सेवा देण्यासाठी प्रयत्न करता येतील. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विचारपूस केली. यावेळी सुनील राऊळ यांनी स्वागत करुन केसरकर यांचा सत्कार केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा