जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल
आमदार वैभव नाईक यांची माहिती
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी पूर्णत्वास नेलेल्या सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस कोर्सच्या तिसऱ्या बॅचसाठी वैद्यकीय मूल्यमापन आणि रेटिंग मंडळाने व नॅशनल मेडिकल कमिशनने मंजुरी दिली आहे. २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात १०० विद्यार्थ्यांची हि बॅच असणार आहे. सिंधुदुर्गच्या विकासाच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल असून आरोग्य सुविधेत हे रुग्णालय महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची समस्या सोडविण्यासाठी आणि जिल्हावासियांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वप्नपूर्ती करण्यासाठी खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक आणि जिल्हावासियांच्या मागणीनुसार तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना केली.यासाठी आवश्यक परवानग्या मिळविण्यात आल्या. गेली दोन वर्षे या वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येकी १०० जागांप्रमाणे दोन बॅचची परवानगी मिळवून २०० विद्यार्थी एमबीबीएस कोर्सचे शिक्षण घेत आहेत. आता तिसऱ्या बॅचसाठी परवानगी मिळाल्याने आणखी १०० असे एकूण ३०० डॉक्टर जिल्ह्यात घडणार आहे. हे डॉक्टर पुढच्या वर्षीपासून प्रत्यक्ष महाविद्यालयात रुग्णांवर उपचार करणार आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय आता हळूहळू दूर होणार आहे.अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.