You are currently viewing भोसले नॉलेज सिटी मध्ये आता डिप्लोमा सोबत डिग्री इंजिनिअरिंगचेही शिक्षण – अच्युत भोसले

भोसले नॉलेज सिटी मध्ये आता डिप्लोमा सोबत डिग्री इंजिनिअरिंगचेही शिक्षण – अच्युत भोसले

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्लीची मिळाली मान्यता

सावंतवाडी

चालू शैक्षणिक वर्षापासून सावंतवाडी येथे इंजिनिअरिंग कॉलेज अर्थात अभियांत्रिकी महाविद्यालय करण्यास अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांची मान्यता प्राप्त झाली आहे. ३०० प्रवेश क्षमता असलेल्या यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफटेक्नॉलॉजी या नवीन महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व कॉम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम उपलब्ध असल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले सावंतवाडीतील श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी मार्फत २०१४ साली यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक हे पदविका अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्यात आले.

गेल्या नऊ वर्षात कॉलेजने सिद्ध केलेला दर्जा व गुणवत्तापूर्ण शिक्षण याचा आढावा घेऊन देशाच्या अभियांत्रिकी शिक्षणातील सर्वोच्च शिखर संस्था अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एआयसीटीई) यांनी भोसले पॉलिटेक्निकचा दर्जावाढ करीत त्याला अभियांत्रिकी पदवी महाविद्यालयाची मान्यता बहाल केली आहे.

चालू शैक्षणिक वर्षापासून कॉलेजचे नाव यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असे राहणार असून या ठिकाणी पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग डिग्री हे दोन्ही विभाग कार्यरत असतील. डिग्री अभ्यासक्रमांना संलग्नता मिळण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे ना हरकत प्रमाणपत्र देखील कॉलेजला प्राप्त झाले आहे. यावर्षीपासून बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण विद्यार्थी येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व कॉम्प्युटर सायन्स या
चार शाखांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख तंत्रशिक्षण देताना यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकने आपली शैक्षणिक गुणवत्ता कायम जपली. इथे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना उत्तम नोकऱ्या मिळाल्या. अनेक विद्यार्थ्यांनी उद्योजक म्हणून नाव कमावले. याच अनुषंगाने कॉलेजला २०१९ मध्ये बेस्ट इमर्जिंग इन्स्टिट्यूट व २०२२मध्ये बेस्ट पॉलिटेक्निक असे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातून एनबीए हे राष्ट्रीय मानांकन प्राप्त करणारे भोसले पॉलिटेक्निक हे पहिले व एकमेव पॉलिटेक्निक ठरले.सावंतवाडी सारख्या ठिकाणी अभियांत्रिकी पदवी महाविद्यालय सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सध्या प्रवेश प्रक्रियेचे दिवस सुरु असून अनेक होतकरू विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच हक्काचे इंजिनिअरिंग कॉलेज उपलब्ध झाले आहे. मोठ्या शहरांमध्ये प्रवेशासाठी लागणारा वेळ व पैसा यांची मोठी बचत होणार असल्याने यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एक उत्तम पर्याय जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 5 =