You are currently viewing बातमी आली तर दोन दिवस शांत रहा..:- खाकी वर्दीच्या सूचना

बातमी आली तर दोन दिवस शांत रहा..:- खाकी वर्दीच्या सूचना

*रेडी, उषानगर येथील जुगाराची बैठक पुन्हा सुरू*

 

संवाद मीडियाच्या बातमीनंतर गेले दोन दिवस बंद असलेली उषा नगर, रेडी येथील जुगाराची बैठक पुन्हा एकदा सुरू झाली असून, या बैठकीत लाखोंची उलाढाल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. गोवा, मालवण, कणकवली आदी ठिकाणाहून मोठमोठे जुगारी रेडी येथील बैठकीत आपले नशीब आजमावत आहेत. खाकी वर्दीचाच अवैध धंद्यांना पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे.

संवाद मीडियाने बातमी दिल्यानंतर दोन दिवस बैठका बंद राहतात, कारण खाकी वर्दी कडून तशा सूचना दिल्या जातात. *”मीडियामध्ये बातमी आली तर दोन दिवस शांत रहा”* अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळेच जिल्ह्यातील रेडी, कोलगाव, कणकवलीच्या आजूबाजूचा परिसर आदी ठिकाणच्या जुगाराच्या बैठकी दोन दिवस बंद राहतात आणि पुन्हा सुरू होतात. या जुगाराच्या बैठका सुरळीत सुरू राहण्यासाठी महिना खाकी वर्दीच्या पल्सिपी डिपार्टमेंटला तब्बल ३००००/- रुपये देण्यात येतात. पल्सीपीचा प्रमुख असलेल्या फंडेराव यांच्या कडे ही रक्कम पोहोचते. वेंगुर्ल्यातील खाकीच्या मुख्य कार्यालयाला ३००००/- रुपये आणि स्थानिक खाकी वर्दीतील रखवालदाराला दिवसाला १०००/- रुपये रक्षणासाठी दिले जात असल्याने सरकार पेक्षा अवैद्य धंद्याकडून जास्त प्रमाणात अवैध पगार मिळत आहे. त्यामुळे खाकी वर्दीचे शिलेदार जुगार्यांचे नोकर असल्यासारखे काम करताना पहावयास मिळते.

*”बातमी आली तर दोन दिवस शांत रहा, आमचा तुम्हाला काहीही त्रास नाही”* अशा प्रकारे खाकी वर्दी कडून जुगारासारख्या अवैद्य धंद्यांना पाठिंबा देत प्रोत्साहन दिले जाते. आरवली या वेंगुर्ले तालुक्यातील आणखी एका नव्या जागी जुगाराची नवीन बैठक बसत असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री असलेल्या स्थानिक नाम.दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात अवैध धंद्यांना पेव फुटले की काय..? अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होत आहे. नाम. केसरकर यांच्या मतदारसंघात जुगार जोरदार सुरू असल्याने नाम.केसरकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक याकडे लक्ष देणार की नाही?? असा सवाल स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे नाम.केसरकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या भूमिका कडे जनतेचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा