*सामाजिक कार्यकर्ता समन्वय समितीची सामाजिक कार्यकर्त्यांच्या परिवर्तनाची चळवळ*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
गुरुवार दिनांक २९ जून २०२३ रोजी आषाढी एकदशीच्या पावन दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई येथे सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती आयोजित लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज लोकगौरव पुरस्कार व महाराणी आहिल्याबाई होळकर समाजगौरव २०२३ पुरस्कारांचे शानदार समारंभात वितरण करण्यात आले.
सदर सन्मान सोहळ्यास उद्घाटक म्हणून मा. श्रीमंत संभाजीराजे जाधवराव (मातृतिर्थ माँ जिजाऊ साहेब सिंधखेडराजा राजे लखोजी जाधवराव यांचे थेट १४ वे वशंज) यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांच्यासोबत विचारपीठावर समारंभ अध्यक्षा म्हणून उद्योजिका व समाजसेविका संगीताताई गुरव, स्वागताध्यक्षा म्हणून मराठा समन्वय परिषद, महाराष्ट्र राज्याच्या कार्यध्यक्षा अनिताताई काळे- पाटील, साहित्यीक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. शांताराम कारंडे, सिने-नाट्य अभिनेत्री स्मिता धुमाळ, सिने-नाट्य अभिनेत्री राजश्री काळे, शिव शंभु संघटना, महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख विजय भोसले, संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे, सामाजिक कार्यकर्ता समन्वय समितीचे अध्यक्ष विजय केदासे तसेच सामाजिक कार्यकर्ता समन्वय समितीचे संस्थापक सदस्य सुरज भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना विजय केदासे यांनी केली. विनोद हिवाळे यांनी उपस्थित पुरस्कार विजेत्यांचे तसेच त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करून तसेच संकल्प संस्था आणि मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली.
सोहळ्यामध्ये संकल्प संस्थेच्या सहसचिव कपिल क्षीरसागर यांना एम/पूर्व विभागांतील वस्त्यांमध्ये रुग्णहक्क या विषयावर खूप चांगल्याप्रकारे कार्य केल्याबद्दल लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज लोकगौरव पुरस्कार तसेच मोहिनी महेश केळसकर यांना महिला बालविकास प्रकल्पांतर्गत कुर्ला येथे अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून कुर्ला विभागातील आदर्श अंगणवाडी कशी आसावी वस्त्या मधील कुपोषित मुक्त बालक या विषयावर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराणी अहिल्याबाई होळकर समाजगौरव पुरस्कार तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या समाजाला आदर्शवत होईल असे उल्लेखनीय कार्य अविरत करत असलेल्या पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महावस्त्र, सन्मानप्रतिमा आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर यांनी केले आहे. तर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सविता हेंडवे, सीमा परिहार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन सुरज भोईर यांनी केले. तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.