You are currently viewing २६ जून -प्रिय लेखक- वपु काळे यांचा स्मृतीदिन

२६ जून -प्रिय लेखक- वपु काळे यांचा स्मृतीदिन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य कवी श्री अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम लेख*

*२६ जून -प्रिय लेखक- वपु काळे यांचा स्मृतीदिन*

त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीस हा लेख सादर अर्पण !
वपुंच्या कथा संग्रह – सखी “चा परिचय-
ले- अरुण वि.देशपांडे-पुणे
————————-
कथा संग्रह – सखी
ले- वपु काळे
————
वाचक मित्रहो नमस्कार-

साहित्याच्या वाचकांच्या लेखक यादीत लेखक वपु काळे “यांचे नाव असतेच असते. तसे माझ्याही आवडत्या लेखकाच्या यादीत कथालेखक वपु काळे यांचे नाव अग्रस्थानी आहे.

गेल्या आठवड्यात लायब्ररीत गेल्यावर कोणते पुस्तक घेऊ ? हा मला पडलेला प्रश्न वपुनीच सोडवला.
पुस्तकांच्या लाईनीत त्यांचा सखी ” कथा संग्रह दिसला , आणि इतके दिवस वाचावयाचा राहून गेलेला वपुंचा हा संग्रह मी अधीरतेने घेऊन आलो.

मुखपृष्ठ उलटल्यावर फोटोसहित वपुंचे दर्शन झाले,आणि
त्यांच्याबद्दलच्या दोन तारखा वाचून त्या आठवणीत पक्क्या ठसल्या-
वपु काळे-
जयंती- २५ मार्च ,१९३२ । स्मृतिदिन-२६ जून ,२००१

आणि आज 26 जून -२०२३ ,वपुंच्या स्मृतिदिनी “हा लेख
एक वाचक-लेखक म्हणून सादर करीत आहे.

मित्र हो – वपुंच्या “सखी ” संग्रहातील कथा वाचून मी प्रभावित झालो”, हे सांगण्यात काही नवेपण आहे ” ,असे मुळीच नाही, कारण
मराठी साहित्याच्या वाचकांवर “वपु “या दोन अक्षरांचे जबरदस्त गारुड कायम आहे, ते यापुढेही असणार आहे.

मेहता पब्लिशिंग हाऊस ,पुणे यांनी जानेवारी १९९४ मध्ये सखी”ची पहिली आवृत्ती प्रकाशित केली, पुढे ऑगस्ट -२०१६ पर्यंत “सखी”च्या १६ आवृत्या प्रकाशित झाल्यात,
जुलै २०१७ ला सुधारित आवृत्ती, आणि जून ,२०१८ मध्ये
पुनर्मुद्रित आवृत्ती, असा या ” सखीचा” प्रवास आहे.

माझ्या वाचनात जून-२०२३ मध्ये आली ती “सखी”संग्रहाची जून-२०१८ मधली पुनर्मुद्रित आवृत्ती आहे, सध्या “सखीची ” कितवी आवृत्ती बाजारात आली आहे , याची कल्पना नाही. असो.
नव्या वाचकांना वपुंच्याबद्दल ,मी माझ्या
क्षमतेप्रमाणे सांगण्याचे ठरवले, मित्रांनो , हा प्रयास”म्हणजे
” वपु नावाच्या थोर लेखकास लेखन अभिवादन आहे “.

लेखक – वपुंची काही वैशिष्ट्य “सखी” संग्रहात खुद्द प्रकाशकांनी सांगीतली आहेत , ती अशी –
वपु हे- लेखक, कथाकथनकार,आर्किटेक्ट, व्हायोलिन व हार्मोनियम वादक, उत्तम रसिक आणि उत्तम फोटोग्राफर ,
आणि ” सुंदरतेचं वेड असणारे, मनाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते.
महाराष्ट्र सरकारनं त्यांना ‘ उत्तम लेखक ‘ म्हणून सन्मानित केलं. अनेक महत्वाच्या पुरस्कारांनी ते सन्मानित झाले.
“रंग मनाचे ” दाखविणाऱ्या वपुंना अनेक जण आपला पार्टनर ” मानतात.
मनात खोलवर रुजलेल्या या “पार्टनरला” २६ जून- २०२३
म्हणजे या स्मृतिदिनी विनम्र आदरांजली अर्पण करतो.
२.
वपु काळे यांची साहित्यसंपदा “कथा संग्रह, ललित, वैचारिक, कादंबरी, व्यक्तिचित्र ” अशा विविध लेखन-प्रकारात पुस्तकरूपाने उपलब्ध आहे”,
३. वपु ” या लेखकाची ही विलक्षण लेखन-प्रतिभा विस्मयकारक आहे.

मित्र हो-
सखी” संग्रहात एकूण दहा कथा आहेत, या सगळ्याच कथा चटकन वाचण्याच्या नाहीत, आणि त्या शब्दसंख्येने मोठ्या असल्याने पटकन वाचायच्या पण नाहीत, हे अगोदर लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे.

या कथा क्रमाने अशा आहेत,
सखी (१), गार्गी (२२), नम्रता (४५), बाप (६४),
शांतिदुत (८०), आकाश (११०), उर्मिला (१३३),
दखल (१४८), झकासराव (१६९),ती आणि तिची सवत
(१८६).

सखी “बद्दल मलपृष्ठावरील मजकूर आहे –
स्त्रीच्या विविध रुपांतून
सर्वात हवंहवंसं वाटणारं
कुठलं रूप असेल,
तर ते असतं ,”सखी “चं.

वेगवेगळ्या ‘अँगल”नं
वपुंना भेटलेली ही सखी…
तिचं अस्तित्व, तिची भावुकता,
वैचारिक उंची, तिची दुःख,
उत्कटता प्रत्येक कथेतून
वेगळं रूप घेऊन अवतरते..

कादंबरी , ललित , वैचारिक ,व्यक्ती-चित्र “असे लेखन करणारे वपू हे माझ्या  वाचक मनाला भावले आहेत
ते ” एक उत्कृष्ट कथा लेखक म्हणून.”.

प्रस्तुतचा “सखी ” कथासंग्रह वाचण्या अगोदर वपुंचे अनेक कथा संग्रह ,मी वाचले आहेत त्यातली काही उदा….

वपुर्वाई , “वन फॉर द रोड “, इन्तिमेट “, वलय , बाई, बायको ,कॅलंडर “, का रे भूलासी ” तप्तपदी “,रंग मनाचे “,
अशी काही नावे आठवणीत आहेत.
मित्रांनो-
सखी “कथा संग्रह असो की इतर संग्रहातील कथा असोत ..कथालेखक वपुंच्या कथांची मला जाणवलेली ठळक वैशिष्ट्य  सांगितली पाहिजेत .

या कथातील व्यक्तिरेखा ..एकमेकांच्या भेटीत बोलतांना,
एकमेकांशी बोलतांना आपापली सुख-दुखः ,विचार ,अनुभव , मनातले गोंधळ ,
अशांत मन:स्थिती , हे सगळं  आड- पडदा न ठेवता ..देवाण-घेवाण करतात ..
यातल्या एक व्यक्तीवर ,  समजावून देण्याची ,समजावून सांगण्याची जबाबदारी टाकतात , हे करतांना यात लेखक म्हणून ते आपले एकूणच चिंतन , अनुभव , निरीक्षण या सगळ्यांना कथेचे घटक बनवून कथेला खूप उंची ..आशयघन खोली प्राप्त करून देतात ..

वपुंच्या कथा ..खूप महत्वाच्या गोष्टींना वाचकांना समजेल अशा शब्दात सांगतात ..की वाचकांना त्यांच्या मनाला
स्पर्श करून जाणारे , डोक्यात  प्रकाश पाडणारे ..असे खूप काही देतात .

वपुंच्या कथेतील व्यक्तिरेखा मोजक्याच आहेत हे ही जाणवते . वपुंच्या लेखक -साक्षीने आपण या व्यक्तिरेखांच्या सोबत आयुष्याचे अनेक रंग , विस्मयकारक अशा अनेक बाजू पाहू लागतो आणि कथा वाचून झाल्यावर वाचक लेखक-वपुंना मनोमन सलाम करतो .हे सगळ आपोआप होते हे वाचक म्हणून मला सांगावेसे वाटते.

वपुंची हे सगळी लेखन -कसब “सखी ” कथा संग्रहातील प्रत्येक कथेतून जाणवते . ..
या संग्रहातील मला आवडलेल्या कथा ..
१.नम्रता (पृ..४५ ), २.बाप ..[प्रु..६४ }, ३. उर्मिला (पृ..१३३ ),४ ) झकासराव (१६९ ),
५ ती आणि तिची सवत (पृ..१८६ )..

१.नम्रता –
ही कथा सासू -गिरजाबाई ,आणि त्यांची सून -नम्रता यांची आहे. कथा वाचतांना आरंभी ही कथा गिरिजाबाई –
गत-काळातल्या प्रख्यात गायिका ,त्यांच्या व्यथेची वाटू लागते ..पण शेवटी ही कथा नम्रता ” या समंजस स्त्रीची आहे हे जाणवते आणि
गायिका -गिरिजाबाईपेक्षा स्वताचे कवित्व सांभाळीत सासूचे मोठेपण न दुखविता वागणारी नम्रता ..मोठ्या मनाची वाटते…
विशेष म्हणजे ..
“ही नम्रता हिच्या नावाप्रमाणेच आदबशीर आहे ह्याचा आणखी एक मनस्ताप आहे ” हे गिरीजाबाईंचे आंतरिक दुःख आहे.
नम्रताचे मौन “हेच तिचे सामर्थ्य आहे “.
ती म्हणते — “यशाची आणि प्रसिद्धीची सोयरिक कायम वर्तमानाशी असते . भूतकाळातल दु:ख अनेक वर्ष साथ देत .
“नम्रता ग्रेट नाही ” हे दर्शविण्यात आता त्यांचा एकमेव आनंद आहे. माझे कोणतेही नुकसान न होता त्यांचा उरलेला हा एकमेव आनंद मी का हिरावून घेऊ ?

नम्रताचे हे व्यक्त होणे ..समजून घेतले की ..तिचा नवरा ,त्याचे वागणे सुद्धा बरोबरच आहे ” असे वाटू लागते.
****

२. बाप
—————–
आपल्या भवताली असलेले पुरुष ..यांचे ..”बाप “असणे , वडील असणे ” त्यांच्या पुरुष “रूपाला विसंगत वाटेल असेच असते .

मुलाचे -बापाचे पटत नाही “, वडील-मुलगा “यांचे जमत नाही “, आपला मुलगा कसा “ना-लायक आहे “,हे कसोशीने पटवून देण्यात धन्यता मानणारे ..”बाप “,वडील , बाबा ” प्रत्येक पिढीत आपल्याला भेटतात , दिसतात ..असतात.
मुलांच्या कौतुकाचा विषय असणारे ..वडील आणि बाबा ..माझ्या मते .घरोघरी सापडणारी व्यक्ती नाही.

अशा वेळी वपुंच्या “बाप “या कथेतील डीजी नी ..मला भुरळ घातली .

” दत्तात्रय गणेश ” म्हणजे डीजी ..हे आपल्याला कळते..
या कथेतील डीजी आणि त्यांच्या मुलाचे एकमेकाशी असलेले भावनिक नाते ..आपल्याला परिचित असलेल्या “बाप-लेकाच्या नात्यापेक्षा
खूपच म्हणजे टोटली वेगळे आहे. ते कसे आहे ते या कथेतच वाचावे, तरच समजेल ..

हे डीजी आपल्या डॉक्टर सुनेला ..शांतीला ..एक मौलिक गोष्ट सांगतात ..
” संसार यशस्वी कधी होतो ते सांगतो —

या संसारात सगळ्या वयाची माणसे असतात , प्रत्येकाची मागणी वेगळी असते ,गरज वेगळी असते ..
“त्या त्या वयाच्या गरजांची टिंगलटवाळी किंवा उपेक्षा न करता त्या गरजा जी मुलगी पुऱ्या करते तिचा संसार दृष्ट लागण्यासारखा होतो “.

शांतीचे हे निवेदन तिचा नवरा कांता – म्हणजे डीजीचा मुलगा ऐकतो ..तेव्हा त्याला समोरची शांती दिसेचना समोर डीजी दिसतात ,
कांता तिला चक्क खाली वाकून नमस्कार करतो.

डी जी या व्यक्तिरेखेत मला मी कधीही न पाहिलेले “बाप ” या व्यक्तीचे विलोभनीय रूप दिसले.

माझ्या लेखक मित्रांना जरूर सांगेन की – कथा कशी असते ? कथेत काय काय नि कसे सांगायचे असते , कथा -आरंभ ,नि मध्य- विस्तार, अनपेक्षित, चटका लावणारा, विचार-प्रवृत्त शेवट ” हे समजेल.

कथा लेखनात उत्कटता , भावनिकता , असावी लागते , तसेच पाल्हाळीक कथा प्रभावहीन , आणि नेमक ,आशयपूर्ण शब्दात जीवनानुभव
सांगणारी कथा  ” या गोष्टी तुम्हाला” वपुंच्या कथा समजावून सांगतील .”

मित्र हो – माझ्या वाचन -प्रवासात , लेखन प्रवासात “वपू  म्हणजे माझ्यासाठी प्रेरक दोस्त आहेत.”

२६ जून -स्मृती दिनानिमित आदरणीय वपुंचे हे शब्द-स्मरण .
———————————————————————————————————————————————————————————————–
लेखक-
-अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
—————————————–

प्रतिक्रिया व्यक्त करा