डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावर दिवाळीच्या पाच दिवसांच्या काळात मोठा जल्लोष साजरा होत असतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फडके रस्त्यावर जल्लोष करणं म्हणजे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखं आहे. हे लक्षात घेऊन पोलिसांनी या रस्त्याच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू केला असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असे सूचनांचे फलक रामनगर पोलिसांनी लावले आहेत. तसेच फडके रस्ता, श्री गणेश मंदिरात परिसरात नागरिकांनी गर्दी करू नये, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी फडके रस्त्यावर तरुण एकत्र येऊन जल्लोष करतात. मागील अनेक वर्षाची ही परंपरा आहे. परंतु यंदा कोरोनामुळे या भागातील गर्दीला आवर घालण्यासाठी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, फ प्रभागाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत, अधीक्षक संजय साबळे यांनी फडके परिसराची पाहणी केली होती.
दिवाळी पहाट साजरी करण्यासाठी फडके रोडवर स्थानिक तरुणांसह ठाणे, बदलापूर, टिटवाळा भागातून तरुणाई उत्साहात हजेरी लावतात. यावेळी लोकल प्रवासाला सामान्यांना मुभा नसल्याने हे तरुण दुचाकी, चारचाकी घेऊन फडके रोड परिसरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी या भागात होऊ शकते. हा प्रकार टाळण्यासाठी फडके रस्त्याकडे येणारे पोहोच रस्ते बांबूचे अडथळे लावून बंद करणार आहे. फडके रोड, नेहरू रोड, टिळकरोड, रेल्वे समांतर रस्ता या सर्व रस्त्यांसह दिवाळीच्या काळात आजूबाजूच्या परिसरात देखील जमावबंदी जाहीर केली आहे.