You are currently viewing ग्रामपंचायत मंजुरीबाबत नवीन कुर्ली ग्रामस्थांची दिशाभूल !

ग्रामपंचायत मंजुरीबाबत नवीन कुर्ली ग्रामस्थांची दिशाभूल !

एकाच ग्रामपंचायतीला दोन वेळा मंजुरी कशी – अनंत पिळणकर

कणकवली

नवीन कुर्ली ग्रामपंचायत मंजुर झाली म्हणून 12 जून रोजी शिंदे गट शिवसेनेने गावात मिरवणूक काढली, तथाकथित पक्ष प्रवेश कार्यक्रम केला. त्यानंतर काल 21 जून रोजी पुन्हा याच पुढार्‍यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत फोटो सेशन करत ग्रामपंचायत मंजुरीचे पत्र मिळाल्याचे जाहिर केले. हा नेमका काय प्रकार आहे? नवीन कुर्ली गावठणासाठी खरोखरच ग्रामपंचायत मंजुर झाली आहे का? की राजकीय श्रेयवादासाठी नागरिकांची दिशाभूल सुरु आहे असा सवाल राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केला आहे. गेली 14 वर्षे या ग्रा.पं.च्या निर्मितीसाठी आम्ही ही प्रयत्न करत आहोत. या कालावधीत संबंधित मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी यांना शेकडो निवदने दिली आहेत. मात्र अशा प्रकारची प्रसिद्धी मिळवण्यासाठी आम्ही कधी असे ‘इव्हेंट’ केले नाहीत, अशी टीका श्री. पिळणकर यांनी शिंदे गट शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांवर केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. पिळणकर यांनी म्हटले आहे, शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी 12 जून 2023 रोजी नवीन कुर्ली वसाहतीतील काही नागरिकांना सोबत घेत नवीन ग्रामपंचायत मंजुर झाल्याचे जाहिर केले. त्या निमित्त ग्रामस्थांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा केला. वसाहतीत जल्लोष मिरवणूक काढली. त्यानंतर आता हेच श्री.आग्रे मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत फोटो काढून नवीन कुर्ली ग्रामपंचायतीला मंजुरी मिळाल्याचे सांगत आहेत. मग नेमके खरे काय? जर 12 जूनला ग्रामपंचायत मंजुर झाली तर 21 जून रोजी मुख्यमंत्र्यांनी कुठल्या ग्रामपंचायतीला मंजुरी दिली. एकाच ग्रामपंचायतीला अशी दोनदा मंजुरी घ्यावी लागते काय? असे सवाल करत याबाबतची वस्तुस्थिती संजय आग्रे यांनी सांगावी असे आवाहन श्री. पिळणकर यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले, खरेतर संजय आग्रे यांचे वरील दोन्ही इव्हेंट ही स्टंटबाजी आहे. केवळ स्वतःचे राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी व आ. नीतेश राणे यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न आहेत. 12 जून रोजी झालेल्या कार्यक्रमात ना. नारायण राणे व आ. नीतेश राणे यांचा साधा उल्लेखही नव्हता. तर 21 जूनच्या कार्यक्रम वृत्तात या ग्रा.पं.साठी नारायण राणे, नीतेश राणे, गिरीश महाजन आदी भाजपा नेत्यांचे सहकार्य लाभल्याचे सांगितले जाते. यावरूनच श्री. आंग्रे यांचा हेतू स्पष्ट होतो. नवीन कुर्ली पुनर्वसन गावठणासाठी ग्रामपंचायत मिळावी यासाठी आम्हीही आग्रही आहोत. आपण स्वतः गेली 14 वर्षे यासाठी पाठपुरावा करत आहे. 2011 साली तात्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे त्यानंतर 2014 साली तत्कालिन पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांना निवेदने दिली होती. 2016 मध्ये आ. नीतेश राणे यांनाही निवेदन दिले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालिन पालकमंत्री उदय सामंत व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाही ग्रा.पं.निर्मितीसाठी निवेदनाद्वारे विनंती केली होती. त्याचबरोबर पाटबंधारे व ग्रामविकास विभागाचे अधिकारी, या कालावधीत असलेली जिल्हाधिकारी, विविध पक्षांचे आमदार, खासदार यांनाही शेकडो वेळा या प्रश्नी निवेदने दिली आहेत. याचे सर्व पुरावे आपल्यापाशी आहेत. आज संजय आग्रेंच्या पुढाकाराने नवीन कुर्ली ग्रामपंचायत मंजुर झाली असेल तर आम्हाला आनंदच आहे. मात्र याबाबत त्यांनी श्रेयवादासाठी राजकारण केल्यास व ग्रामस्थांची दिशाभूल केल्यास आम्ही सहन करणार नाही, असा इशारा श्री. पिळणकर यांनी दिला.

बॅनरवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे फोटो
नवीन कुर्ली ग्रामपंचायत मंजुर झाल्याचा व ग्रामस्थांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा भला मोठा बॅनर वसाहतीत लावला होता. या बॅनरवर काही राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांचे फोटो लावून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे दाखविले होते, मात्र ती निव्वळ नौटंकी होती. ते सर्व कार्यकर्ते आजही राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असून आपल्या सोबत असल्याचा दावा अनंत पिळणकर यांनी केला आहे.

त्यांनी आमने-सामने यावे
आमच्या माहितीनूसार नवीन कुर्ली ग्रामपंचायतीला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. तरीही संजय आंग्रे यांचा दावा खरा असेल तर त्यांनी ग्रामपंचायतीसाठी केलेला पाठपुरावा व मंजुरीचे पत्र घेवून यावे. आम्हीही या ग्रामपंचायतीसाठी केलेले प्रयत्न व पाठपुरावा याचे पुरावे घेवून येतो. नवीन कुर्ली ग्रामस्थांसमोरच हा आमने-सामने कार्यक्रम होवू देत असे खुले आव्हान श्री. पिळणकर यांनी श्री. आंग्रे यांना दिले आहे. त्यांनी ग्रा. पं मंजूर करून आणल्यास आपण त्यांचा जाहीर सत्कार करू, असे‌ त्यांनी सांगितले .

प्रतिक्रिया व्यक्त करा