You are currently viewing विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग वाढवा – दीपक भोगटे यांचे शिक्षकांना आवाहन

विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग वाढवा – दीपक भोगटे यांचे शिक्षकांना आवाहन

कुडाळ :

सध्याचे युग हे प्रचंड स्पर्धेचे असल्याने या स्पर्धेत ग्रामीण भागातील मुलांचा टिकाव लागायचा असेल तर छोट्या वयापासून विद्यार्थ्यांची तयारी करून घ्यावी लागेल. यासाठी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी मुलांना अधिकाधिक स्पर्धा परीक्षांचा अनुभव मिळवून द्यायला हवा, असे आवाहन बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांनी केले.
समाजवादी नेते आणि माजी नगरसेवक साथी लक्ष्मण जाधव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, सोनवडे तर्फे हवेली येथे शालेपयोगी साहित्य वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भोगटे म्हणाले, वेंगुर्ले दाभोली येथील वसंत दाभोलकर याने जिल्हा परिषद, वेंगुर्ले हायस्कुल आणि खर्डेकर कॉलेज असा प्रवास करत असूनदेखील आपण शहरी मुलांच्या मागे नसल्याचे दाखवून देत यूपीएससी या देशातील सर्वात कठीण परीक्षेत ७४ वा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे त्याने आपल्याला हे यश मिळाले त्याची पूर्व तयारी जिल्हा परिषद आणि गावातील हायस्कुलमधून झाल्याचे अभिमानाने सांगितले आहे याकडे सुद्धा भोगटे यांनी लक्ष वेधले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना भोगटे यांनी शिक्षकांना दोन युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. मुलांना तुम्ही घडवाल तशी ती पुढची पावले टाकतील. नेहमीच्या अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना स्पर्धा परीक्षांचा अनुभव द्यायला हवा. यशपयशाच्या पलीकडे जाऊन हा विचार केल्यास मुलांच्या ज्ञानात इतकी भर पडेल की आयुष्याच्या शर्यतीत ती कधीच मागे पडणार नाहीत. यासाठी त्यांनी नाथ पै सेवांगण राबवत असलेल्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे महत्व पटवून दिले. मालवण परिसरात आम्ही हा प्रयोग यशस्वी केला आहे. सोनवडे येथील मुलांच्या उन्नतीसाठी सेवांगण शिक्षकांना सर्व प्रकारची मदत करायला तयार आहे, असे भोगटे यांनी सांगितले.

जिल्हा परिषद शाळांमधील मुलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पालकांना आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आजूबाजूला अनेक पर्याय निर्माण झाल्याने जिल्हा परिषद शाळा ओस पडू लागल्या आहेत. ही ओहोटी थांबवायची असेल तर आता या शाळांमधील शिक्षकांनी आधी चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करायला हवा. मुलांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी नेहमीच्या अभ्यासापेक्षा जगाचे ज्ञान या मुलांपर्यंत पोहचवायला हवे. आणि तसे झाले नाही तर जिल्हा परिषद शाळांना टाळी तर लागतीलच, पण शिक्षकांच्या नोकऱ्या सुद्धा धोक्यात येतील. याची सुरुवात झाली असून याकडे आता क्षणभर सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही, असे स्पष्ट विचार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ज्येष्ठ पत्रकार संजय परब यांनी मांडले.

यावेळी साने गुरुजी व्याख्यानमालेचे कार्यकर्ते रमेश तांबे यांनी मुलांना कविता, गोष्टी सांगत कार्यक्रमात अतिशय रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता जाधव वडनरे यांनी केले. तर आभार ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते जगदीश नलावडे यांनी मानले. हा कार्यक्रम लक्ष्मण जाधव परिवाराने आयोजित केला होता. सोनवडे हे जाधव यांचे जन्मगाव असल्याने या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रगतीसाठी यापुढे सतत प्रयत्न केले जाणार असल्याचा ठोस विश्वास जाधव परिवाराने यानिमित्ताने व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा