भेसळयुक्त दारूच्या नादात तरुण पिढी बरबाद…
संपादकीय…..
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनवटीच्या दारूचे मुख्य सेंटर आहे ते सावंतवाडीत. लॉकडाऊनच्या काळात सर्व वाहने बंद होती, आंतरराज्य, आंतरजिल्हा वाहतूक सुद्धा बंद होती, परंतु गोव्याच्या दारूचा जिल्ह्यातील पुरवठा मात्र कधीच बंद नव्हता. गोव्यातून डिंगणे मार्गे येणाऱ्या चोरट्या वाटेने दारूच्या गाड्या राजरोसपणे येत होत्या. त्यांना कोणाचेही बंधन नव्हते. चोर वाटेने जर अडचण आलीच तर तेरेखोल खाडीतूनही दारू सिंधुदुर्गात आणण्याचा यशस्वी प्रयोग दारूच्या बादशहांनी केला.
कोरोनाच्या काळात जिल्ह्या बाहेर एकही गाडी जात नव्हती परंतु दारूच्या गाड्या मात्र राज्याच्या बाहेरही जाऊन भरून येत होत्या. जीवनावश्यक वस्तूंच्या गाड्यांना असणारा परवाना जणू दारू सुद्धा जीवनावश्यक असल्यासारखा या गाड्यांना सुद्धा परवाना होता की काय हे सुद्धा अनाकलनीय होतं. जेव्हा गाड्यांची वाहतूक करणे जिकरीचे झाले तेव्हा दारूच्या गोंधळ्यांनी खाडीतून बोटींच्या सहाय्याने दारू आणत वेंगुर्ला जवळील काही समुद्रकिनारी दारू उतरवून घेत स्थानिक तरुणांना पैशाचे आमिष देत दारूची वाहतूक सुरू ठेवली होती.
हायवेवर होणारी दारूची धरपकड काहीवेळा रेडी, वेंगुर्ला परिसरात व्हायला लागल्यावर दारूची वाहतूक खाडीमार्गे होत असल्याचे दिसून आले.
गोवा बनावटीची दारू सिंधुदुर्ग सह राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरवठा केली जाऊ लागली. खाकीला, एक्साईजला,आणि राजकीय नेत्यांना हाताशी धरल्यामुळे बिनदिक्कत पणे दारूची वाहतूक होऊ लागली. गोव्याची दारू आणून भेसळ करून महाराष्ट्राची लेबल लावून विक्री केली जाऊ लागल्याने दारूचे बादशाह मात्र दारूच्या गोंधळामुळे मालामाल झाले. बंगल्यांवर मजले चढले, व्यावसायिक इमारती उभ्या राहिल्या, महागड्या गाड्या दारात वाढू लागल्या. खाकीचे शिलेदार हे त्यांना मदत करत राहिले त्यांनी सुद्धा सावंतवाडीत आणि मुंबई, पुण्यात फ्लॅट घेतले. पगारापेक्षा जास्त हफ्ता असणाऱ्या महागड्या गाड्या खरेदी केल्या. पुणे मुंबई ची सफर सुद्धा दारुवाल्यांचा पैशात त्यांच्याच गाड्यांमधून व्हायला लागली.
एकीकडे दारुवाले आणि खाकीचे शिलेदार मालामाल होत असताना शाळा, कॉलेजचे तरुण मात्र व्यसनाकडे, दारूच्या व्यवसायाकडे पैशांच्या आकर्षणापोटी ओढले गेले आणि त्यांतच तरुनपिढी बरबादीकडे ओढली जाऊ लागली.
क्रमशः
