*ज्येष्ठ कवयित्री सौ. विनिता कदम लिखित “सूर्यशलाका” काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न*
सातारा :
ज्येष्ठ कवयित्री सौ. विनिता कदम लिखित “सूर्यशलाका” काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक २२/११/२०२६ रोजी लेक व्ह्यू, गोडोली, सातारा येथे दिमाखात संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक डाॅ. राजेंद्र माने, प्रमुख अतिथी श्री. प्रवीण बोपुलकर उपस्थित होते. मान्यवरांपैकी ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. सुधाकर बेंद्रे, पुस्तकाची पाठराखण करणारे कवी, लेखक, गझलकार श्री.रविंद्र यशवंतराव देशमुख, डाॅ.अदिती काळमेख, शब्दान्वय प्रकाशनाचे प्रमुख श्री. प्रभाकर पवार इ. मान्यवरांनी सोहळ्याला शुभेच्छा देताना आपले मनोगत व्यक्त केले.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजेंद्र माने आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “कविता ही उचकीसारखी असते. ती थांबवता येत नाही. सौ.विनिता कदम यांच्या विविध विषयांवरील कविता जाणकार आहेत. तिला स्वतःचे असे वेगळे तेज आहे त्यामुळे *सूर्यशलाका* हे नाव सार्थ आहे. याचबरोबर या कवयित्रीला आत्मभान, समाजभान, वृत्तांचे ज्ञान, मुबलक शब्दभांडार असल्यामुळे वाचकांच्या मनाशी सलगी करते.”
ज्येष्ठ साहित्यिक डाॅ .अदिती काळमेख म्हणाल्या की स्वतःला आतून मोकळं करणं हि लेखकाची प्रवृत्ती असते. हा लेखकाचा मोकळा होऊ पाहणारा श्वास वाचणं हि वाचकाची प्रवृत्ती आहे. एक वाचक म्हणून प्रत्येकाने आपल्या प्रकृतीला जागून हा काव्यसंग्रह वाचला पाहिजे. कारण काव्यसंग्रहामध्ये शेतीमातीचे सौंदर्य, निसर्ग, व्यवहार, समाज, नातेसंबंध याबद्दल असणाऱ्या कवितांमधून कवयित्रीला चांगली जाण असल्याचं सिद्ध होतं. यांच्या कविता या वाचकांच्या काळजाला भिडणाऱ्या आहेत आपल्याशा वाटणाऱ्या आहेत. विनिता कदम यांना गुरुतुल्य असणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुधाकर बेंद्रे यांची या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लाभली आहे. तसेच पुस्तकाचे मलपृष्ठ ज्येष्ठ गझलकार श्री.रविंद्र यशवंतराव देशमुख यांनी लिहिले आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे सुप्रसिद्ध गझलकार, कवयित्री सौ. दीपाली घाडगे,पनवेल यांनी उत्कृष्ट रित्या केले. यांचे वाकचातुर्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
या कार्यक्रमाला सूर्यशलाका या काव्यसंग्रहाच्या कवयित्री साै. विनिता ताराचंद कदम यांचे संपूर्ण कुटूंब, मित्रपरिवार, नातेवाईक उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन डाॅ. मंगल जाधव आणि डाॅ. माणिक जाधव यांनी केले . प्रकाशन कार्यक्रमा नंतर उपस्थितांचे कविसंमेलन उत्साहात पार पडले.
पुस्तकाचे नाव:- सूर्यशलाका (काव्यसंग्रह)
कवयित्री:- साै.विनिता ताराचंद कदम
प्रस्तावना:- डाॅ. सुधाकर बेंद्रे
मलपृष्ठ:- श्री. रविंद्र यशवंतराव
प्रकाशन:- शब्दान्वय प्रकाशन मुंबई
किंमत:- २२५/-
