*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नजरेतून वास्तव निसटतयं..!!*
जिभेच्या स्पर्शासरशी पाणीही
भयाच्या ..चवीनं थरथरत
वास्तव नजरेतून निसटतयं
पुन्हा-पुन्हा ..मरावं लागत…
विवस्त्र आयाबहिणींना छळत
झुंड …भरदिवसा हिंडते
काजळकाळा आंधळा डोह
सौभाग्य ..कपाळी गिळते..
मेलेल्या पोराला.. बाप
झोळीत नेतांना दिसतो
बाजारातून बायकोचा मृतदेह
सायकलवरून.. नेतांना पाहतो..
बापावर ..कर्जभार नको
पोरींची आत्महत्या बघतो
प्रवेश …मिळाला नाही
विद्यार्थी पंख्याला लटकतो..
नजरेतून वास्तव निसटतयं
पुन्हा-पुन्हा ..मरावं लागत
राख उडतसे …स्मशानात
मार्गीलावे जीवांना अज्ञातात..
भयपिसाट मेंदूच्या ..शापांनी
मला…परकं वाटू लागलं
रक्तपित्या बेबंद गारठ्यात नजरेतून वास्तव निसटलं….
नजरेतून वास्तव निसटतयं….!!
बाबा ठाकूर, पुणे
