मालवणच्या १९ साहित्यिकांचा युवा साहित्य संमेलनात विशेष सन्मान!; तीन वाचनालयांतील सहा आदर्श वाचकांचाही होणार गौरव
मालवण : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या मालवण परिसरातील १९ मान्यवर साहित्यिकांचा सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन – २०२६ मध्ये विशेष सन्मान करण्यात येणार आहे. याचबरोबर वाचनसंस्कृती जोपासणाऱ्या मालवणमधील तीन वाचनालयांच्या माध्यमातून निवड करण्यात आलेल्या सहा आदर्श वाचकांचाही गौरव करण्यात येणार आहे. साहित्यिकांच्या कार्याची दखल घेण्याबरोबरच वाचनाची आवड जोपासणाऱ्या नव्या आणि ज्येष्ठ पिढीला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरणार आहे.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण येथे २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘माझा काळ, माझी भूमिका’ ही संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. ग्रंथदिंडी, स्थानिक कवी संमेलन, निमंत्रित कवी संमेलन, मुलाखती, विविध साहित्यिक स्पर्धा आणि वैचारिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांनी संमेलनाची रूपरेषा आखण्यात आली आहे.
या संमेलनात सन्मानित होणाऱ्या साहित्यिकांमध्ये साहित्यनिर्मितीपासून नाट्य, पत्रकारिता, शिक्षण, लोककला, संगीत आणि सामाजिक जनजागृतीपर्यंत विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या मान्यवरांचा समावेश आहे.
सन्मानित होणारे १९ साहित्यिक
अरविंद म्हापणकर : मालवणी भाषेतील साहित्यनिर्मितीसाठी परिचित असलेल्या अरविंद म्हापणकर यांचे ‘गावगजाली’ आणि ‘सरमिसळ’ हे साहित्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘केला तुका झाला माका’, ‘प्रतिकार’ आणि ‘प्रेम पहावं करून’ ही त्यांची नाटकेही उल्लेखनीय आहेत. वयाच्या ८४ व्या वर्षीही त्यांचे लेखन सुरू आहे.
डॉ. विवेक रेडकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले एम.डी. डॉक्टर म्हणून ओळख असलेल्या डॉ. रेडकर यांनी वैद्यकीय संशोधनासोबत सामाजिक क्षेत्रातही योगदान दिले आहे. आरोग्यविषयक लेखनातून त्यांनी जनजागृती केली असून ‘आरोग्याचे पोस्टमार्टम’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.
रवींद्र वराडकर : ३२ वर्षांच्या अध्यापन सेवेसोबतच त्यांनी ललित लेख, व्यक्तिचित्रे, कथा, कविता आणि समीक्षात्मक लेखन केले आहे. कोकण मराठी साहित्य परिषद, मालवण शाखेचे तालुकाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत.
वैशाली पंडित : गेली चार दशके साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या वैशाली पंडित यांचे एक कथासंग्रह, पाच ललित लेखसंग्रह आणि चार चरित्रग्रंथ प्रकाशित झाले आहेत. ‘ऐलमा पैलमा अक्षरदेवा’ या उपक्रमाच्या त्या संस्थापक आहेत. लेखन, संपादन, अभिनय आणि अभिवाचन अशा विविध क्षेत्रांत त्यांचे योगदान आहे.
संध्या शिवराम तांबे : ‘कोकणच्या बहिणाबाई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संध्या तांबे या निवृत्त शिक्षिका आणि कवयित्री आहेत. वयाच्या अकराव्या वर्षापासून त्यांचे लेखन सुरू झाले. ‘पालवी फुटलेली स्वप्ने’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध असून त्यांच्या कवितांचा समावेश मुंबई विद्यापीठाच्या एम.ए. अभ्यासक्रमात झाला आहे. आदर्श शिक्षिका पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे.
रुजारिओ पास्कॉल पिंटो : मालवणी, कोकणी, मराठी आणि हिंदी भाषांमध्ये साहित्यनिर्मिती करणारे पिंटो यांचे ‘माऊली’, ‘दर्यादेगेर’, ‘आम्ही मालवणी’, ‘गरो फणसाचो’, ‘माँ मेरी’ आणि ‘बुमरँग’ हे साहित्य प्रसिद्ध आहे. त्यांच्या कवितांचा समावेश गोवा शिक्षण मंडळ आणि मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात झाला आहे.
विनायक प्रल्हाद कोळंबकर : विज्ञान आणि गणित विषयाचे निवृत्त शिक्षक असलेले कोळंबकर लेखक, नाट्यपरीक्षक आणि दशावतारी कलाकार म्हणूनही परिचित आहेत. शैक्षणिक लेखनासोबत लोककलेच्या क्षेत्रात त्यांनी योगदान दिले असून ‘श्री महापुरुष दशावतार मंडळा’च्या माध्यमातून ते कार्यरत आहेत.
मेघना संजय जोशी : शिक्षिका, समुपदेशक आणि बालसाहित्य लेखिका म्हणून परिचित असलेल्या मेघना जोशी यांची ‘अ’क्षरांच्या कविता’ आणि ‘गडबडगुंडा’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘लोकसत्ता बालमैफल’मधील ‘हितशत्रू’, ‘ऑफ बिट’, ‘वाक्प्रचाराच्या गोष्टी’ आणि सध्या सुरू असलेले ‘गुण घेईन आवडी’ हे त्यांचे लेखन विशेष लोकप्रिय आहे. विविध लेखन कार्यशाळांच्या माध्यमातूनही त्या साहित्यप्रसाराचे कार्य करतात.
प्रफुल्ल देसाई : पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रफुल्ल देसाई यांनी ‘रत्नागिरी टाइम्स’मध्ये काम केले आहे. पत्रकारितेसोबतच त्यांनी एकांकिका लेखनाच्या माध्यमातून नाट्यक्षेत्रातही योगदान दिले आहे.
मंदार श्रीकांत सांबारी : कवी, गीतकार, संगीतकार, गायक आणि शीघ्रकवी म्हणून मंदार सांबारी यांची ओळख आहे. कोकणच्या मातीशी आणि संस्कृतीशी नाते सांगणारी त्यांची गीते लोकप्रिय आहेत. ‘नक्षत्र गौरव’, ‘मानगायक’ आणि ‘गानकवी’ अशा सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
कमलेश विनायक गोसावी : कवी, कथालेखक, शिक्षक आणि कातळशिल्प अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. ‘हिरवळ’, ‘मुक्यांच्या हाका’, ‘वाकड्या चालीच्या रिती’ आणि ‘खेळताखेळता इंजिनिअरिंग’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. मालवणी नाटकांसाठी गीतलेखन, आकाशवाणीवरील कार्यक्रम आणि कातळशिल्प संवर्धनाच्या क्षेत्रातही ते कार्यरत आहेत.
शुभदा (तनुश्री) राजेश पेडणेकर : देवबाग येथील कवयित्री आणि लेखिका असलेल्या शुभदा पेडणेकर यांचा ‘शब्दगंध’ हा साहित्यसंग्रह प्रसिद्ध आहे. बालसाहित्य, कविता आणि खाद्यसंस्कृतीविषयक लेखन विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहे.
उमेश दिनकर कोदे : कांदळगाव येथील लेखक असलेल्या उमेश कोदे यांनी गावाचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा यांचे दस्तऐवजीकरण केले आहे. ‘गाथा कांदळगावची, महती रामेश्वराची’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.
सुयोग श्रीनिवास पंडित : पत्रकार, संपादक आणि ‘आपली सिंधुनगरी न्यूज’चे संस्थापक-संपादक म्हणून ते परिचित आहेत. ‘सुक्या सुंगटाची कढी’ ही त्यांची मालवणी कादंबरी प्रसिद्ध आहे. मद्यविरोधी जनजागृतीच्या कार्यातही त्यांचा सहभाग आहे.
संदीप दत्ताराम चिपकर : मालवणी नाट्यलेखन आणि रंगभूमीवर योगदान देणारे नाटककार म्हणून त्यांची ओळख आहे. ‘शेजारी पडलो आजारी’, ‘बनवाबनवी’, ‘टॉस का बॉस’, ‘इस्काटलेली जिंदगी’ आणि ‘दे दणका’ ही त्यांची नाटके लोकप्रिय आहेत.
सुरेश ठाकूर : शिक्षण, साहित्य आणि बालनाट्य क्षेत्रात चार दशकांहून अधिक काळ योगदान देणारे सुरेश ठाकूर हे जिल्हा परिषद शिक्षक आणि केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत होते. ‘शतदा प्रेम करावे’ आणि ‘शब्दांच्या पलीकडले’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद, मालवण आणि साने गुरुजी कथामाला, मालवणचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.
ऋषी देसाई : दूरचित्रवाणी पत्रकारिता आणि वृत्तनिवेदन क्षेत्रात कार्यरत असलेले ऋषी देसाई यांनी झी २४ तास, टीव्ही ९ मराठी, लोकशाही मराठी आणि पुढारी न्यूज अशा माध्यमांतून काम केले आहे. ‘नाटक मंडळी’ या ऑनलाइन मालिकेच्या माध्यमातून त्यांनी नाट्यविश्वातील व्यक्ती आणि घडामोडी प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत.
राजेंद्र खांडाळेकर : मालवणी साप्ताहिक ‘जनयुग’चे संपादक म्हणून ते परिचित आहेत. आपल्या काकांनी सुरू केलेल्या प्रकाशनाची परंपरा त्यांनी पुढे सुरू ठेवली आहे. संपादकीय लेखन, साप्ताहिकाचे वितरण आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानातून ते कार्यरत आहेत.
नंदकिशोर महाजन : ४ ऑक्टोबर १९४७ रोजी सुरू झालेल्या ‘आघाडी’ या साप्ताहिकाचे संपादक आणि प्रकाशक म्हणून ते कार्यरत आहेत. साप्ताहिकाची दिवाळी अंकाची परंपरा त्यांनी जपली असून नवोदित लेखकांना लेखनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
तीन वाचनालयांतील सहा आदर्श वाचकांचाही गौरव
साहित्यिकांच्या सन्मानासोबतच वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी मालवणमधील तीन वाचनालयांच्या माध्यमातून आदर्श बाल वाचक आणि आदर्श मोठा वाचक यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचाही संमेलनात विशेष गौरव होणार आहे.
१. शिवाजी वाचन मंदिर
बाल वाचक – कुमार हिमांशू संतोष मालवणकर
मोठा गट – श्री. अनंत महादेव अंधारी
२. नगर वाचन मंदिर
मोठा गट – श्री. प्रफुल कमलाकर गवंडे
बाल गट – कु. अस्मि अशोक आठल्येकर
३. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिर
बाल गट – सोहम धामापूरकर
मोठा गट – श्री. चंद्रप्रकाश पिंगुळकर
साहित्यिकांचा विशेष सन्मान आणि आदर्श वाचकांचा गौरव अशा दोन्ही उपक्रमांतून मालवणच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि वाचनपरंपरेचा गौरव होणार आहे. स्थानिक साहित्यिकांच्या कार्याची समाजाला ओळख करून देणे, नव्या पिढीमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे आणि साहित्य, कला व सर्जनशील अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणे, हा या संमेलनामागील महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामुळे २८ व २९ नोव्हेंबर रोजी होणारे हे संमेलन साहित्यप्रेमींसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे.
