You are currently viewing नाते तुझे माझे
Oplus_16908288

नाते तुझे माझे

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*नाते तुझे माझे*

 

मी येता समीप

जातोस दूरदूर

कसा जुळावा मग

प्रीतीचा आपल्या सूर….

 

तू ऐकतोस गाणी

मला गझल भावते

वाद्यांचा गोंधळात

तंद्री माझी हरवते.‌‌..

 

रंग फिकट तुला

मला गर्द आवडतात

बट कपाळावर येता

डोळे तुझे वटारतात…

 

तुझे सामान अस्ताव्यस्त

मला नीटनेटके हवे

विसरणे तुझ्याकडे

आठवणे मला यावे…

 

वाद बारीकसारीक

घालायची हौस तुला

एकच मोठं भांडण अन्

गप्प करावं तुला…

 

गजरा मला आवडतो

तू आणतो गुलाबफूल

याच विरोधाभासाची

मनाला पडते भूल…

 

तुझं माझ जुळेना

पण सहवासाने गुंतलेले

हारामधे संसाराच्या

विरूध्द दिशेत गुंफलेले…

 

अरुणा दुद्दलवार

प्रतिक्रिया व्यक्त करा