संविधान दिनानिमित्त सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम; सिंधुदुर्गनगरीत संविधान दिंडी व जनजागृती रॅलीचे आयोजन
सिंधुदुर्ग
भारतीय संविधान दिनानिमित्त गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला व विजयदुर्ग किल्ला परिसरात स्वच्छता मोहीम तसेच सिंधुदुर्गनगरी येथे ‘संविधानाची दिंडी व जनजागृती रॅली’ काढण्यात येणार आहे.
संविधान दिनाचे औचित्य साधून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या राज्यातील अकरा किल्ल्यांच्या परिसरात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि पर्यटन विभाग यांच्या संयुक्त समन्वयातून गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ ही या उपक्रमाची संकल्पना असून, सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यासोबतच संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन, ‘स्वराज्याचा वारसा, संविधानाचा वसा’ या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, पथनाट्य, गडमित्रांचा गौरव आणि गडांच्या संवर्धनाचा संकल्प असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
तसेच, सिंधुदुर्गनगरी येथे सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ओरोसपर्यंत संविधान दिंडी व जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.
या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.
