संजू परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून नवव्या वर्षाच्या संगीत मैफलीचे उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती
सावंतवाडी : त्रिपुरारी पौर्णिमेच्या मंगलमय वातावरणात सुरेल स्वरांची मेजवानी देणाऱ्या ‘हे चांदणे फुलांनी’ या विशेष संगीत मैफलीचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या संगीत मैफलीचे नवव्या वर्षी आयोजन करण्यात आले आहे.
या उद्घाटनप्रसंगी नगरसेविका दीपाली भालेकर, प्राध्यापक गोवेकर सर, ज्येष्ठ कवी दादा मडकईकर, सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख निलेश मेस्त्री, किशोर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सद्गुरू संगीत विद्यालयाचे नामांकित व यशस्वी विद्यार्थीही उपस्थित होते.
त्रिपुरारी पौर्णिमेच्या चांदण्यांनी उजळलेल्या वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या संगीत मैफलीमुळे संगीतप्रेमींना सुरेल गीतांचा आनंद अनुभवण्याची पर्वणी उपलब्ध झाली. सलग नवव्या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमातून सावंतवाडीतील सांगीतिक आणि सांस्कृतिक परंपरेला प्रोत्साहन मिळत आहे.
