*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री फूड टेक्नॉलॉजिस्ट स्वाती सिंग लिखित अप्रतिम लेख*
————————————-
“डाळीचं पीठ अर्थात् बेसन”
घाटावर (सह्याद्रीच्या पलीकडे) घट्ट पिठल्यालाच बेसन म्हणतात, अगदी सुकं, फ्राय भाजी वाटावी इतकं घट्ट. सहसा डाळीचं पीठ या घटक पदार्थाला बेसन म्हटलं जातं. बेसन ही भारतीय उपखंडाची खासियत आहे. प्रथिनांचा छान स्रोत आणि जेवणाला उत्कृष्ट चव आणणारं.
बाळाला साय-बेसन लावण्यापासून तुकतुकीत कांतीसाठी तरूण चेहेऱ्यावर ‘पॅक’ म्हणून उपयोगी आहेच, पण आपलं स्वयंपाकघरही अपुरं आहे ह्या बेसनाशिवाय. प्रसंगी भात/ पोळीला/ भाकरीला आधार म्हणून फक्त झुणका /पिठलं करतात. विदर्भात बेसन-भात एकत्रच केला जातो. कोवळी मेथी कुस्करून घातलेलं पिठलं आमच्या आवडीचं. झुणक्यातही डांबे, पालक, भरपूर कांदा, कांदापात, लसूणपात घालून नाना प्रकार केले जातात. अहो, कधी हिरव्या मिरचीची फोडणी; कधी फक्त लाल तिखटाची फोडणी चवींत बदल आणतात. चिंचगूळ वा आमसूल घालून केलेलं आंबट पिठलं फर्मास लागतं.
पीठ पेरून भाज्या (पडवळ, भेंडी,भोपळी मिरची,पालेभाज्या), भरून केलेल्या भाज्या (भेंडे, कारलं, परवर) यात जान आणतं ते बेसन. शिवाय गोळ्यांची आमटी, धिरडी, कढी दाटसर करण्यासाठी हमखास लागतंच.
भज्यांचे आवरण म्हणून( कांद्याची -गोल व खेकडा, मिरची, बटाटा, मायाळू व ओव्याची पाने, घोसाळं), अळूवडी, कोथिंबीरवडी, सुरळीची वडी यांत बेसन वेगळंच रूप धारण करतं. बेसन आंबवून केलेले ढोकळा, खमणी नाश्त्यात रंगत आणतात.
प्रसिद्ध बटाटावड्याचे आवरण, ब्रेड-पकोडा, पॅटीस यांची चव न्यारी लागते ती बेसनामुळे. हल्ली तर पुष्कळ ठिकाणी वडापावासोबत डाळीच्या पीठाचीच ओलसर घट्ट चटणी देतात- पिठल्यागत. तळणात उरलेल्या; करपलेल्या गाळापासून पण सुकी चटणी करतात. म्हणजे “बेसनाचा विजय असो!”
बेसनापासून बनणारे मेवामिठाईचे पदार्थही काही कमी नाहीत. जसे की घीवर, मैसूर पाक, बुंदी व मोतीचूरलाडू, बेसन लाडू , हलवा, मोहनथाळ, सोहनभोग इत्यादी. हे सगळे हलवायाकडे किंवा आता कारखान्यात तयार होतात.
घरचा दिवाळीचा फराळ बेसनाशिवाय कसा पूर्ण होईल बरे? शेव, लाडू , बुंदी इत्यादि, इत्यादि.
आई स्वयंपाक करताना बेसन असलेल्या पदार्थांमध्ये ओवा चुरून टाकायची. वातूळ बाधू नये म्हणून. तर वड्यांच्या आवरणात धणे भरडून घालायची. पुनःपुन्हा तळायची देखील नाही.
ऑम्लेट म्हटलं की टोमॅटोचं की अंड्याचं प्रश्न येतोच? तर शाकाहारी खवय्यांसाठी टोमॅटो, कांदा, कोथिंबिर घातलेलं खरपूस ऑम्लेट म्हणजे छान नाश्ता!(काही म्हणतात बेसनाचा पोळा.)
बेसनात घोळून तळलेले शेंगदाणे, वाटाणे तोंडात टाकायला चखणा म्हणून अधूनमधून बरे. विशेषतः पावसात. पिकनिकला पण.
कुरकुरीत भुजिया, मिसळीतील फरसाण-शेव-पापडी-गाठी, फाफडा हे बेसनापासूनचे आणखी लोकप्रिय पदार्थ.
थायलंड येथे ‘टेंपुरा’ Tempura हा भज्यांसारखाच एक पदार्थ मिळतो. यांत भाज्या, मासे, मांसाचे तुकडे पिठात बुडवून तळतात. एकदम पारदर्शी आवरण आणि कुरकुरीत. पण चव मात्र मिळमिळीत; खमंग, चटकदारपणा नाहीच कारण त्यांच पीठ असतं पांढरं, तांदळाचं. बेसन नव्हे काही.
सालं काढलेल्या हरभऱ्याची डाळ दळून बेसन तयार केलं जातं. तर उत्तर भारतातील प्रसिद्ध ‘सत्तू’ हे सालीसकटचे चणे भाजून, दळून करतात. सत्तूपासून पराठे, ताक व पाण्यातील पेय, सत्तूभरून कणकेची भाजून ‘लिट्टी’ असे प्रकार बनवले जातात.
तिकडचीच कढी; बेसनात थोडं दही घालून घुसळून केलेली; तिखट व घट्ट असते. ह्या कढीत बेसनाचीच भजी टाकून होतात कढी-पकोडे ; गुजरात आणि राजस्थान स्पेशल.
कणकेत बेसन वगैरे घातलेली मिस्सी रोटी वेगळ्याच चवीची.
लहानपणात डोकावलं की साजूक तूपाचा (बेदाणा खोवलेला) खुमासदार बेसन लाडू मटकावायचा अधिक त्याच्यावर भांडंभर पाणी प्यायचं. काहीजणी रवा-बेसन लाडू वळतात. प्रसादातली शेवबुंदी, मालवणचा कडक शेवलाडू आणि खाजे, मैत्रिणीच्या डब्यातली बेसन-मिरची, एस् टी स्टँडवरची कुरकुरित खेकडा भजी नजरेसमोर तरळतात; त्यांची चव अधेमधे जीभेवर घोळत राहते.
बेसनापासून असे आणिक नवनवीन खाण्याचे पदार्थ होतच राहतील. प्रथिनं पुरवणाऱ्या बेसनामुळे आपल्या जेवणात म्हणून जीवनात देखील चटकदार स्वाद, पौष्टिकता आणि वैविध्य आलं आहे हे अगदी नक्की!
————————————————-
[शब्दसंख्या 495]
लेखक: स्वाती देवधर-सिंग
Food Technologist, Nutritionist and Food Safety consultant
फोन 9892303495
