आदरणीय आप्पांना भावपूर्ण आदरांजली….

आदरणीय आप्पांना भावपूर्ण आदरांजली….

राजकारणाचे झपाट्याने होणारे गुन्हेगारीकरण आणि समाजावर आणि विशेषतः सामान्य लोकांवर होणारे सामाजिक परिणाम या गंभीर विषयावर माझ्या सारखे सामान्य कार्यकर्ते जेव्हा चिंतन करतात तेव्हा सध्याच्या राजकीय व्यवस्थेबाबत निर्माण झालेली कमालीची नकारात्मकता थोडीफार दुर व्हायची असेल तर काही काळ या व्यवस्थेमध्ये आदर्श जनप्रतिनीधी म्हणून आपलं आयुष्य समर्पित केलेल्या आदरणीय आप्पासाहेब गोगटे यांचं स्मरण करणे मनाला निश्चितच उभारी देते.
देवगड सारख्या दुर्लक्षीत आणि डोंगराळ मतदार संघाच त्या काळात सतत चारवेळा प्रतिनिधित्व करणारे आदरणीय आप्पा हे कोणा एका पक्षाचे नव्हे तर ते सगळ्या जनतेचे प्रतिनिधी होते.जात, धर्म, पंथ, पक्ष या पलिकडे आपाचे व्यक्तीमत्व आणि कार्यशैली होती. ते अवघ्या देवगड मतदार संघाचे कुटुंबप्रमुख होते. त्या काळात दळवळणाच्या आतासारख्या सुविधा नव्हत्या. रस्त्यांची परिस्थिती तर अतिशय बिकट..पण आप्पानी सरकारं कोणत्याही पक्षाचं असो मतदार संघात मुलभूत सुविधा निर्माण करण्याचा ध्यास घेऊन अहोरात्र कष्ट घेऊन मतदार संघात रस्ते, वहातुक, पाणि अशा सुविधा लोकांना उपलब्ध करून दिल्या. महाराष्ट्र विधानसभेत सर्वपक्षीय आमदार, नेते आप्पाना सन्मान आणि आदर देत असतं.सेना भाजपची सत्ता असताना आदरणीय आप्पासोबत अनेकदा मंत्रालयीन पातळीवर जाण्याचा योग आला.आप्पा ज्या ज्या मंत्र्याकडे किंवा सनदी अधिकाऱ्यांकडे कामानिमित्त जात तेव्हा ते आपल्या आसनावरुन उठून आपांच स्वागत करत.काही मंत्री व अधिकारी आप्पाना सांगायचे,”तुम्ही कशाला त्रास घेऊन आलात..कुणाकडे तरी निवेदन पाठवायचे होते”..आदरणीय आप्पानी हा आदर,सन्मान स्वतः एका वेगळ्या आणि आदर्श कार्यपद्धतीतून मिळवला होता.आपल्या पक्षाची विचारसरणी जपत असताना दुसऱ्या पक्षांच्या नेत्याकडे, कार्यकर्त्याकडे व्यक्त होतानाही ते सौजन्याने वागत म्हणून सर्वपक्षीय कार्यकर्ते आप्पाकडे जाताना निःसंकोचपणे जात असतं.
आप्पाच्या प्रचारात काम करतं असताना कार्यकर्ता म्हणून एक वेगळाच उत्साह असायचा.भले त्या काळात आतासारखी सहज उपलब्ध असणारी “अमाप रसद”नसेल पण एका आदर्श लोकप्रतिनिधीसाठी आपण आपल्या आयुष्यातील काही क्षण खर्च करतोय याचं समाधान असायचे.आप्पाबरोबर आमदार निवासात अनेकदा राहिलो.मी जेव्हा जेव्हा असायचो तेव्हा रात्री जेवणाची वेळ झाली की आप्पा आठवण करायचे”चला जावूया ना जेवायला”..खूप आठवणी,खूप अनुभव घेतलाय आदरणीय आप्पासारख्या सौजन्यमूर्तीचा…दिवसेंदिवस नैतिकद्र्ष्य्टया ढासळतं चाललेली राजकारणतील नैतिक मुल्ये आणि बाजार पाहिला कि आप्पासारख्या देवदुतांची आठवण येते..
… पुन्हा आप्पा होणे नाही…
आदरणीय आप्पाना भावपूर्ण आदरांजली..
..अँड.नकुल पार्सेकर..

प्रतिक्रिया व्यक्त करा