You are currently viewing मला तुझी…जात हवी..!!

मला तुझी…जात हवी..!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मला तुझी…जात हवी..!!*

 

मला हवे.. तुझे आडनाव

मला हवे.. ..तुझे उच्चार

कोरड्या भाकरीचा तुकडा

मी तुझ्यावर ओवाळून फेकणार..

 

तुझे जोडलेले हात

माझ्या ..प्रार्थनेकरता हवे

आकाशाकडे रोखलेले माझे हात

तुझ्या देवाकडे पोचायलाचं हवे..

 

शतकानूशतके परवड झाली माझी

पिसाटकल्लोळांत दबलेत माझे मौन हुंकार…

त्या माझ्या गुलामी पुरातन हुंकारांना

तुला रिच्टरस्केलवर मोजावचं लागणार

 

मला तुझी..मला तुमची..जात हवी

असा किती काळ ..तुमच्यांत राहू

तुम्हीच हातोड्याने खिळ्यांनी ठोकले

कालपटलावर माझे निरागस बाहू..

 

आसूड मनुस्मृतीच्या नियमावलीतून

अजून किती काळ मला छळणार

मला अंधश्रद्धेतून बाहेर..पडायचं

मीचं आता …तुमची जात घेणार..!

 

बाबा ठाकूर , पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा