*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आई… आई…*
जात्यावरती दळत असता माझी आई
तरीही मी मांडीवरती करतसे गाईगाई..
दर फेऱ्याला हिसका बसे तो मांडी वरती जाई
तरीही मांडीवरती करतसे मी गाईगाई..
हिसके नव्हते बसत मजला? गाढ मी झोपत होते
आई आणि काकू दोघेही फिरवत होत्या जाते..
मजा वाटते मला मी दिसते मांडीवर आईच्या
दळत होत्या दोघी जोडीने मऊ मऊ सायीच्या..
नकोच झोपू कधी न म्हटले कधीही दळतांनाही
खरेच का हो अशीच असते सांगा सर्वांची आई..
कष्ट तिचे ना तेव्हा कळले दिसते पुसतांना घाम
कायपण हो नशिब होते कधी न मिळाला आराम..
कधी न काढला ब्र कधीही प्राक्तन मानून होत्या
किती त्या सोशिक किती कष्टाळू पहा बायका होत्या..
उतराई ना होऊ शकलो खंत दाटते आता
प्रणाम करते क्षमा करी गे म्हणते आता “माता”..
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
