फुटब्रिजसह रस्ते, शाळा इमारत आणि जमीन प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा; शाळेसाठी १० लाखांचा तातडीचा निधी जाहीर
मुंबई / प्रतिनिधी :
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी अंधेरी येथील कार्यालयात हळदीचे नेरूर ग्रामस्थ विकास मंडळ, मुंबईच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली. माजी सरपंच दिलीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली मुंबईस्थित ग्रामस्थांनी एकत्र येत गावातील विविध विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांवर आमदार निलेश राणे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी आमदार राणे यांनी सर्व प्रश्नांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली.
गावातील बारमाही वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या फुटब्रिजच्या बांधकामासाठी तातडीने निधी मंजूर करून भूमिपूजन आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याबाबत चर्चा करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासूनची कायमस्वरूपी पुलाची मागणी पूर्णत्वास जात असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. याबद्दल मंडळाच्या वतीने आमदार निलेश राणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
हळदीचे नेरूर ते पालमळी येथील जटाशंकर मंदिराकडे जाणाऱ्या सुमारे तीन किलोमीटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचे आमदारांनी सांगितले. तसेच नेरूर ते देवघरवाडी, कुंदणवाडी, अंजीवडे व वसोली या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या खडीकरण व डांबरीकरणाचे कामही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
न्यू इंग्लिश स्कूल, हळदीचे नेरूर या शाळेच्या इमारतीच्या दुरवस्थेचा प्रश्न भिकाजी नेरकर यांनी मांडला. यावर आमदार राणे यांनी तातडीने १० लाख रुपयांचा निधी जाहीर केला असून, उर्वरित १५ लाख रुपयांचाही निधी लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
टाळंबा धरणाच्या बुडीत क्षेत्रातील संपादन न झालेल्या जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर ‘टाळंबा प्रकल्पासाठी संपादन’ असा असलेला शेरा काढण्याचा मुद्दा दिलीप सावंत यांनी उपस्थित केला. याबाबत आगामी विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी मांडून महसूल मंत्री व जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन आमदारांनी दिले.
तसेच आकारीपड जमिनींच्या प्रश्नावरही चर्चा झाली. या प्रश्नाशी संबंधित १४४० लाभार्थ्यांना जमिनीवरील हक्क व मालकीसंदर्भातील पत्रांचे वाटप करण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल, असे आमदार राणे यांनी स्पष्ट केले.
हळदीचे नेरूर गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी शंभर टक्के सकारात्मक प्रतिसाद दिला. मुंबईस्थित तसेच गावातील सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही देत गावाच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी हमी त्यांनी दिली.
यावेळी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन विकासकामांसाठी लोकप्रतिनिधींच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन माजी सरपंच दिलीप सावंत आणि मुंबई समितीचे सचिव भिकाजी सावंत यांनी केले.
या भेटीवेळी मंडळाचे अध्यक्ष दाजी पालकर, सचिव भिकाजी सावंत, सदस्य बाळा पालकर, भिकाजी नेरकर, एस. के. कविटकर, प्रशांत पालकर आणि विठ्ठल खंदारे, अमित पालकर आदी उपस्थित होते. ही भेट अत्यंत सकारात्मक व समाधानकारक झाल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
