*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*
*उत्तरायणातील खंत*
खरं सांगायचं तर उत्तरायण हा शब्द खगोलशास्त्राशी संबंधित आहे. उत्तर + आयन( गमन किंवा प्रवास) सूर्याचे उत्तरेकडे होणारे गमन.
तसं पाहिलं तर प्रत्येक गोष्टीला पूर्वार्ध, मध्य आणि उत्तरार्ध असतो. जन्म ते मृत्यू या आयुष्याच्या प्रवासाचे सुद्धा पूर्वार्ध, मध्य आणि उत्तरार्ध हे तीन मुख्य टप्पे आहेत. पूर्वार्ध म्हणजे बालपण ते कौमार्य, यौवन ते प्रौढावस्था हा आयुष्याचा मध्य आणि प्रौढावस्थेतून वृद्धावस्थेकडील होणारा प्रवास म्हणजेच आयुष्याचे उत्तरायण!
उत्तरायणातील खंत याविषयीचा विचार करताना माझे असे मत आहे की संपूर्ण आयुष्याचा प्रवास( बालपण वगळता) सुखदुःख मिश्रितच असतो. जीवन जगताना सतत मनात कसली ना कसली तरी खंत, काळजी, चिंता असतेच. शाळा कॉलेजातील विद्यार्थ्यांना अभ्यास, परीक्षा, पुढे नोकरी, व्यवसाय याची खंत असते. मला चांगल्या विद्यालयात प्रवेश मिळेल का? परीक्षेत उत्तम मार्कांनी मी उत्तीर्ण होईन का? मनासारखी नोकरी मिळेल का? व्यवसाय सुरू केला तर आहे, पण या स्पर्धेच्या युगात माझा निभाव लागेल का? नवरा कसा मिळेल? मला आवडणाऱ्या मुलीकडून होकार मिळेल का? एक ना दोन, अनेक चिंता आणि प्रश्न मनात सतत घोळत असतात.
एकीकडे जगण्याचा आनंद आणि दुसरीकडे संसार चक्रातून फिरता फिरता मनात उत्पन्न होणारे हे विविध प्रश्न सोडवत सोडवतच प्रत्येक जण आयुष्याच्या उत्तरायणाशी येऊन थबकतो. संसारातून हळूहळू विरक्त होण्याच्या प्रयत्नात असताना मनात एकेकदा विचारांचे काहूर माजते. त्यातच ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर गप्पा मारीत बसले असताना कधी कधी भलत्या सलत्या बातम्या कानावर येतात.
मध्यंतरी माझ्या कानावर अशी बातमी आली होती की परदेशात स्थायिक असलेल्या मुलाने भारतात येऊन आई-वडिलांना गोड गोड बोलून फसविले. ” तुम्ही एकटे इथे राहू नका. मला वारंवार येणे शक्य होत नाही आणि त्यामुळे तुमची सतत काळजी लागून राहते. तेव्हा इथली सर्व मालमत्ता, घरदार विकून आणि सगळे आर्थिक व्यवहार माझ्यावर सोपवून तुम्ही माझ्यासोबत अमेरिकेला चलाच. नातवंडात तुमचे मन रमेल आणि मागे कसल्याच झंझटी उरणार नाहीत. ” आई बापाचा मुलांवर तर विश्वास असतोच ना? आपल्या मुलाला आपली किती काळजी आहे असे वाटून आईबाप मुलांचे ऐकतात आणि नंतर उर्वरित आयुष्यभर होते नव्हते ते सर्व मुलाला देऊन बसलो आणि आता पश्चातापाची पाळी आली आहे असे म्हणत कपाळावर हात मारत रडत बसावे लागते. अशा प्रकारच्या गोष्टी ऐकल्या की मनात नाही नाही त्या शंका येऊन खंत निर्माण होते. मी माझ्या मुलाला उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवून चूक तर नाही ना केली? मनाला कितीही समजविण्याचा प्रयत्न केला तरी कुठेतरी खंत डिवचतच राहते. अमक्याने त्याच्या आईला वृद्धाश्रमात ठेवले, माझ्यावर तर अशी वेळ येणार नाही ना? सासू आणि सून एकत्र राहत असतील तर चित्र आणखीच वेगळे. दोन पिढ्यांतील माणसे एकत्र आली की मतभेद,वादावादी होणारच.
काळ झपाट्याने पुढे चालला आहे. जसजशा पिढ्या बदलत जातात तसतसे माणसांचे विचार बदलतात. आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले म्हणजे मुलांचे त्यांच्यावर प्रेमच उरले नाही असे आजच्या आई-वडिलांनी मुळीच म्हणू नये, असे माझे स्पष्ट मत आहे. आधुनिक तांत्रिक विज्ञानामुळे अख्या जगाचे सर्व राष्ट्रांशी निकटचे संबंध वाढले आहेत. औद्योगिक जागतिकीकरण झाले आहे. परिणामी आजचा तरुण चोवीस तास काम करत असतो. अशा परिस्थितीत वृद्ध आई-वडिलांकडे इच्छा असूनही त्यांना पुरेसे लक्ष देता येत नाही. नोकरी सांभाळू की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या आईची/ बाबांची सेवा करू असे त्या तरुणास/ तरुणीस होऊन जाते. अशावेळी वृद्धाश्रमात पैसे भरून स्वतःची जबाबदारी त्यांनी आश्रमावर सोपविली तर त्यात गैर काय आहे? शिवाय आश्रमात समवयस्क मंडळी भेटतात. त्यांच्यासाठी काही शैक्षणिक (विशेषतः वैद्यकीय सल्ले देणारे), सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले गेले असते. त्यामुळे त्यांची करमणूक होऊन चांगल्या प्रकारे सोशल लाइफ अनुभविता येते.
प्राप्त परिस्थितीत आपल्या मुलांना दोषी ठरवून विनाकारण मनात खंत करत बसण्यापेक्षा हातातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत घेत आपला हा उत्तरायणाकडे झुकत चाललेला प्रवास प्रत्येकाने करीत रहावा या मताची मी आहे.
आमच्या ठाणे शहरात विमलताई रांगणेकर हे एक असे व्यक्तिमत्त्व होते. दिसायला अत्यंत देखण्या, सुखवस्तू वकिलांच्या कुटुंबातून वाढलेल्या, संस्कारित झालेल्या. त्यांचे पती एकेकाळचे गाजलेले क्रिकेटपटू ( खंडू रांगणेकर), त्यांनी मात्र त्यांचे संपूर्ण जीवन समाजसेवेसाठी वाहून घेतले होते. त्यांची दोन्ही मुले, सुना उत्तम परिस्थितीत, परंतु त्यांनी कधी त्यांच्या उतार वयात स्वतःविषयीची खंती बाळगली नाही. जेव्हा त्या थकत गेल्या तेव्हा स्वेच्छेने वृद्धाश्रमात राहण्याचे त्यांनी ठरवले आणि तेथे सुद्धा त्यांचे समाजकार्य (वृद्धाश्रमाशी निगडित) चालूच ठेवले. अलीकडेच दोन-चार वर्षांपूर्वी वयाच्या ९२/९३ व्या वर्षी वृद्धाश्रमातच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.
हे उदाहरण सांगायचा हेतू हाच की कोणत्याही गोष्टीची खंत करणे हे त्या त्या माणसाच्या प्रकृतीवर अवलंबून असते. आपण अशी छान उदाहरणे डोळ्यासमोर ठेवून जगावे आणि जीवनाच्या अंतापर्यंत आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.
प्रत्येकच नाण्याच्या दोन बाजू असतात, एकाचा उत्तरायणातील अनुभव वाईट असला तरी दुसऱ्याचा चांगला असू शकतो. शेवटी पूर्व संचित जे आहे ते भोगल्याशिवाय सुटका नाही असे जाणून खंत करत बसण्यापेक्षा जीवनाचा आनंद घ्यावा.
*अरुणा मुल्हेरकर*
*मिशिगन*
