रायगड (गुरुदत्त वाकदेकर) :
शिवस्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शालोपयोगी साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, २० जून २०२६ रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा, आदिवासी वाडी वाघेरी, सांधोशी, कावळे, खलई, सावरट आणि मांडले येथे हा उपक्रम पार पडला.
शिक्षण क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ मिळावे, यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात आला.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संचालिका वनिता साळुंखे, अध्यक्ष प्रवीण जाधव, उपाध्यक्ष विकास पारठे, सचिव शीतल पवार, सदस्य मनोज निकम, माधवी पारठे, ॲड. सल्लागार योगेश बामणे, ज्येष्ठ सल्लागार शिवाजी कुटे, हेमंत परब, अवधूत जाधव, वीहान पारठे तसेच सर्व शिक्षकवृंद आणि महिला कार्यकारिणी यांनी विशेष योगदान दिले.
शिक्षणविषयक उपक्रमांद्वारे समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचण्याचे कार्य संस्थेमार्फत सातत्याने सुरू आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले.
‘शिक्षण हाच खरा शिवसेवा’ या ध्येयवाक्याला अनुसरून राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरला. शिक्षण हेच स्वातंत्र्याचे खरे शस्त्र आणि प्रगतीचा राजमार्ग असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे प्रभावी उदाहरण ठरला. शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि वंचित विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक मदत पोहोचविण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
