You are currently viewing शेतकऱ्यांच्या दारात पोहोचली जिल्हा बँक; दुग्धव्यवसायाला आर्थिक बळ
Oplus_16908288

शेतकऱ्यांच्या दारात पोहोचली जिल्हा बँक; दुग्धव्यवसायाला आर्थिक बळ

बांदा – मडुरातील २५ शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांच्या खरेदीसाठी कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण; जिल्ह्यात एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट!

बांदा / प्रतिनिधी :

दुग्धव्यवसाय ही केवळ शासकीय योजना नसून शेतकऱ्यांच्या मेहनतीतून, सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आणि सामूहिक सहभागातून उभी राहणारी एक चळवळ आहे. या चळवळीला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले. बांदेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, बांदा येथे दुधाळ जनावरे खरेदी योजनेअंतर्गत मंजूर कर्ज प्रस्तावांच्या मंजुरीपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

या योजनेंतर्गत बांदा व मडुरा येथील एकूण २५ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला दोन नवीन दुधाळ जनावरांच्या खरेदीसाठी सादर केलेल्या कर्जप्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, यावेळी संबंधित शेतकऱ्यांना मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांना बँकेपर्यंत येण्याऐवजी बँकेने थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून राबविलेला हा उपक्रम शेतकरीहिताचा आणि नावीन्यपूर्ण ठरला आहे.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मनीष दळवी म्हणाले की, शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य, व्याजदरात सवलत आणि कर्जपुरवठ्याच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. गेल्या दोन-तीन वर्षांत जिल्ह्यातील दूध उत्पादन १५ हजार लिटरवरून ४० ते ५० हजार लिटरपर्यंत पोहोचले आहे. ही निश्चितच समाधानकारक प्रगती आहे. ही वाढ कायम ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, योग्य प्रशिक्षण, जनावरांचे शास्त्रीय संगोपन आणि व्यवसायाचे योग्य नियोजन आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी केवळ जनावरांची संख्या वाढविण्यावर भर न देता दुग्धव्यवसाय अधिक सक्षम, शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्यासाठी प्रयत्न करावेत. दूध उत्पादन वाढविण्याबरोबरच उत्पादन खर्च कमी करणे, पाणी व चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करणे महत्त्वाचे आहे. दूध संकलन केंद्रांच्या माध्यमातून ओला चारा, सुका चारा आणि पशुखाद्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था निर्माण करावी. तसेच महागडी यंत्रसामग्री वैयक्तिक स्तरावर खरेदी करण्याऐवजी दूध संस्था व शेतकरी गटांनी सामूहिकरीत्या खरेदी करून ती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

यावेळी भगीरथ संस्थेचे प्रसाद देवधर यांनी दुग्धव्यवसायातील प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, शास्त्रीय पद्धतीने जनावरांचे संगोपन, योग्य आहार व्यवस्थापन आणि सातत्याने नवनवीन बदल आत्मसात करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतींचा स्वीकार केल्यास दुग्धव्यवसायातून आर्थिक समृद्धी साधता येईल, असे त्यांनी सांगितले.

दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट यशस्वीपणे गाठावे, अशी श्री देव बांदेश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करून या चळवळीत सहभागी होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी अभिनंदन केले.

यावेळी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, बांदेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष नारायण गावडे, दुग्ध व्यावसायिक अनिरुद्ध करंदीकर, बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच बांदा व मडुरा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा