You are currently viewing पणदूरच्या संविता आश्रमात ‘मिशन आनंदाचे सूर’ उपक्रमातून आनंदाची बरसात!

पणदूरच्या संविता आश्रमात ‘मिशन आनंदाचे सूर’ उपक्रमातून आनंदाची बरसात!

पणदूरच्या संविता आश्रमात ‘मिशन आनंदाचे सूर’ उपक्रमातून आनंदाची बरसात!

YONE Foundation चा सामाजिक उपक्रम; संगीत, खेळ आणि संवादातून आश्रमातील रहिवाशांसोबत युवकांनी घालवले आनंदाचे क्षण

सिंधुदुर्ग :

युवकांच्या सामाजिक सहभागातून समाजातील विविध घटकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याच्या उद्देशाने YONE Foundation च्या वतीने पणदूर येथील संविता आश्रमात ‘Mission आनंदाचे सूर’ या विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

YONE Foundation चे संस्थापक समीर अशोक जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला. संगीत, शायरी, विविध मनोरंजक खेळ आणि मनमोकळ्या संवादाच्या माध्यमातून आश्रमातील रहिवाशांसोबत युवकांनी आनंदाचे क्षण घालवले.

कार्यक्रमाची सुरुवात शायरी आणि संगीताने झाली. त्यानंतर आश्रमातील रहिवाशांसाठी विविध सोपे आणि मनोरंजक खेळ आयोजित करण्यात आले. युवकांनी प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधत त्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेतले. संगीत, हास्यविनोद आणि सामूहिक सहभागामुळे संपूर्ण परिसरात आनंदी वातावरण निर्माण झाले.

या उपक्रमाचा उद्देश केवळ मनोरंजन करणे नसून आश्रमातील रहिवाशांना वेळ देणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आणि त्यांच्यामध्ये आपलेपणाची भावना निर्माण करणे हा होता. समाजसेवा म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे, तर एखाद्याला आपला अमूल्य वेळ देणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

YONE Foundation चा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा पहिलाच सामाजिक उपक्रम असून संस्थेच्या सामाजिक कार्याच्या विस्ताराच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. युवकांच्या कला, संगीत आणि सामाजिक जाणीवांचा उपयोग समाजातील विविध घटकांच्या आनंदासाठी व्हावा, या हेतूने भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

‘For the Youth. By the Youth. With the Youth.’ या ब्रीदवाक्याने प्रेरित YONE Foundation युवकांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा