You are currently viewing दोडामार्गमध्ये भीषण अपघात; दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू

दोडामार्गमध्ये भीषण अपघात; दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू

दोडामार्गमध्ये भीषण अपघात; दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू

भेडशी रोडवर दुचाकी आणि टाटा मॅजिकची समोरासमोर धडक; टाटा मॅजिकचा चालक जखमी

दोडामार्ग :

दोडामार्ग येथील स्नेह रेसिडन्सीजवळ भेडशी रोडवर आज सकाळी दुचाकी आणि टाटा मॅजिक गाडी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात टाटा मॅजिकचा चालक जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टाटा मॅजिक गाडी भेडशीहून दोडामार्गच्या दिशेने येत होती. याचवेळी रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकी आणि टाटा मॅजिक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात मृत्यू झालेले दोघेही चुलत भाऊ असून, ते पेंटिंगच्या कामासाठी एकत्र जात होते. राजकुमार झाटव (वय २५, अविवाहित) आणि अर्जुन झाटव (वय ३०, विवाहित) अशी मृतांची नावे आहेत. अर्जुन यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुले असा परिवार आहे.

दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील अरवल गावचे रहिवासी असून, रोजगारासाठी दोडामार्ग येथे आले होते. ते सध्या एका कंत्राटदाराकडे राहत होते. या अपघातात टाटा मॅजिकचा चालकही जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. या अपघाताबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा