You are currently viewing दिन दिन दिवाळी

दिन दिन दिवाळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम लेख*

 

🪔 *दिन दिन दिवाळी* 🪔

 

*’ वसुबारस ‘*

 

आज पासून दिवाळीचा सण सुरू होतो आहे. यानिमित्ताने आपण सामाजिक सलोखा कायम राखत पण मनामनातलं अंतर कमी करत नाती जास्त सुदृढ करणार आहोत. कारण प्रत्येक सणाचे हेच तर प्रयोजन असते. हा तर ‘दिवाळीचा सण’. वर्षातला सर्वात मोठा सण.

दिवाळी हा फक्त एकच उत्सव नाही बरं का ! तर हे उत्सवांचे स्नेहसंमेलन आहे. हा फक्त एकाच देवतेचा उत्सव नसून तो लोकव्यवहाराशी जास्ती जोडलेला आहे. मुख्य म्हणजे हा प्रकाशाचा उत्सव, नात्यांचा उत्सव, लक्ष्मीचा उत्सव, निसर्गाचा उत्सव, विजयाचा उत्सव असे अनेकरंगी पदर असणारा उत्सव आहे.

अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असे सहा दिवस हा उत्सव साजरा होतो. त्यातला पहिला दिवस म्हणजे ‘गोवत्स द्वादशी’. यालाच ‘ वसुबारस ‘असेही म्हणतात. आपल्या संस्कृतीत गाय फार पवित्र मानली जाते. लक्ष्मीच्या अंशापासून उत्पन्न झालेली सवत्स धेनु म्हणजे ‘सुरभि’. हीच गोमातांची अधिदेवता आहे. दिवाळीत हिचे पूजन केले जाते. एरवी सुद्धा ‘ गो-ग्रास ‘ म्हणून पोळी-भाताचा नैवेद्य काढून ठेवला जातो. वसुबारस तर काय गायींचाच उत्सव त्यामुळे या दिवशी तिचे विशेष कौतुक होते.

यानिमित्ताने प्राण्यांचे रक्षण करणे, निसर्गाच्या प्रती ऋण व्यक्त करणे हा मुख्य संदेश दिलेला आहे. हाच या सणामागचा मुख्य उद्देश आहे. अनेक उपकारक प्राण्यांचे ऋण आपण व्यक्त करतो, त्यातलाच हा एक दिवस. या दिवशी गायींचा गोठा स्वच्छ करून रंगवतात. तिथे पणत्या लावतात. मुख्य म्हणजे गायींना ओवाळून नैवेद्य देतात. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. ग्रामीण भागात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गायीसमोर गाणी म्हटली जातात. गाण्यांमधून गाईच्या गुणांचे, शेतीच्या कामांचे वर्णन केलेले असते. या गाण्यांमधून एकमेकांना कोडी घालण्याचा खेळ खेळला जातो.

कृतज्ञता व्यक्त करणे हा आपल्या भारतीय संस्कृतीचा स्थायीभाव आहे. वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने निसर्गाचे पूजन करून त्याच्या प्रती ऋण व्यक्त केले जाते. आपला देश हा कृषिप्रधान देश आहे आपल्या संस्कृतीत गाई-वासरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या निसर्गातील प्राणिमात्रांचे रक्षण केले पाहिजे. कोणत्याही कारणाने, कोणत्याही प्रकारे निसर्गाला हानी पोहोचवायची नाही. ध्वनी-वायू प्रदूषण रोखले पाहिजे. निसर्गाचे रक्षण, संवर्धन केलं पाहिजे. हा संदेश या सणातून घ्यायचा आहे. निसर्ग संवर्धन मोहीम, वसुंधरा महोत्सव या अभियानांचे हेच उद्दिष्ट आहे.

 

*निसर्ग धरतीचे लेणे हो*

*त्याचे रक्षण करणे हो* ||

हे कायम स्मरणात ठेवायला हवे.

तेव्हा या निमित्ताने आपण पुन्हा निसर्गाच्या जास्ती जवळ जाऊ या. त्याच्याशी आपले नाते पुन्हा घट्ट करू या. दिवाळीची सुरुवात आनंदाची करू या.

 

 

*’ धनत्रयोदशी ‘*

 

दिवाळी सणाच्या रुपाने सुखाचे, समाधानाचे, समृद्धीचे जीवन लाभावे अशी कामना प्रत्येकजणच करतो. त्यासाठी समृद्धीची म्हणजे धनाची पूजा केली जाते. आज संध्याकाळी धने, गुळ, पिवळी फुले वाहून धनाची म्हणजे पैशांची, लक्ष्मीची पूजा करतात. आणखी एक गोष्ट म्हणजे संपन्न जगण्यासाठी बुद्धी आणि धन जितके महत्त्वाचे तितकेच आरोग्यही महत्त्वाचे असते. म्हणूनच आज आरोग्यदेवतेचे सुद्धा पूजन करतात.

समुद्र मंथनातून निघालेले पाचवे रत्न म्हणजे ‘धन्वंतरी’. याच धन्वंतरीला आरोग्याची देवता मानतात. याच धन्वंतरीची आज पूजा करून उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी तिची प्रार्थना करतात.

याशिवाय आजच्या दिवशी आणखी एक गोष्ट सांगितली आहे; ती म्हणजे अपमृत्यू टाळण्यासाठी यमाला म्हणजे मृत्यूच्या देवतेला दक्षिणेकडे तोंड करून दीपदान करावे. पद्म पुराणानुसार अपमृत्यूच्या विनाशा करता आणि यमाच्या सत्कारासाठी दीप लावावेत असे सांगितलेले आहे.

याबाबतची एक आख्यायिका सांगतात. हैमराजाला पुत्रप्राप्ती झाली. त्या पुत्राची कुंडली पाहून ज्योतिषांनी भाकीत केले की, त्याच्या विवाहानंतर चौथ्या दिवशी सर्पदंशाने त्याचा मृत्यू होईल. तो मृत्यू टाळण्यासाठी राजाने शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण अखेर ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरली. राजाला आणि प्रजेला अतोनात दुःख झाले. हे पाहून यमदूतही व्यथित झाले. त्यांनी यमराजाला प्रार्थना केली की,’असा अपमृत्यू कोणाच्याही वाट्याला येऊ नये. यमराज गंभीर झाले आणि त्यांनी असा वर दिला की ‘ दिवाळीचे पाच दिवस जे लोक दीपोत्सव करतील त्यांच्या वाट्याला असं दुःख येणार नाही.’

माणूस वृद्धापकाळाने जाणे हा झाला नैसर्गिक मृत्यू. तो कुणालाही चुकलेला नाही आणि चुकविता येतही नाही. पण आजारपणाने, रोगराईने, सर्पदंशाने अवेळी जाणे म्हणजे अपमृत्यू. पूर्वी अशा मृत्यूंचे प्रमाण फार होते. त्यामुळेच असे अपमृत्यू टाळण्यासाठी देवाची प्रार्थना केली जायची.

आज-काल वैद्यक शास्त्र अतिशय प्रगत झालेले आहे. इतरही सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे अशा मृत्यूंचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे. पण आज-काल वेगळ्या अपमृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. अपघात, घातपात, आत्महत्या, व्यसनाधीनतेमुळे होणारे मृत्यू खूप वाढलेले आहे. हे सर्व अपमृत्यूच आहेत. शिवाय पूर्वी प्लेग, कॉलरा असे आजार होते. तर आता काविळ, डेंग्यू ताप, स्वाईन फ्ल्यू, कोविड-१९ असे आजार आले आहेत.

पण यातल्या बऱ्याच गोष्टी टाळणे तर आपल्याच हातात आहे. या सणांचा हाच मूळ उद्देश असतो. परिसराची जशी स्वच्छता करायची तशीच मनाची सुद्धा करायची. म्हणजे दुरावा विसरून नाती पुन्हा घट्ट करायची. थोडं आत्मचिंतन, थोडं आत्मपरीक्षण करायचं. व्यसनं दूर सारून अती राग, द्वेष, अतीवेगावर नियंत्रण करून हे अपमृत्यू नक्कीच कमी करता येतील.

आजच्या दिवशी आरोग्याला घातक व्यसनांचा त्याग करून आरोग्यपूर्ण जीवनाचा निश्चयच आपण सगळ्यांनी केला पाहिजे. सगळ्यांनी या मागचा विचार समजून घेतला पाहिजे म्हणजे, या सणांचा आनंद निश्चितच द्विगुणित होणार आहे. म्हणूनच आज दीपदान करायचे.

मुळामध्ये दिवाळी हा दीपोत्सव असल्यामुळे दिवा हा केंद्रस्थानीच असतो. म्हणूनच घराघरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी विविध प्रकारांनी दिव्यांची आरास केली जाते. सारा आसमंत उजळून जातो. मन आनंदाने, उत्साहाने भरून जाते.

*सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा.*

 

*शुभ दीपावली.*🙏

*ज्योत्स्ना तानवडे.पुणे*

प्रतिक्रिया व्यक्त करा