फोंडाघाटमध्ये वसुबारस उत्साहात साजरी; गाय-वासरांचे पूजन करून दिवाळीचा शुभारंभ!
श्री राधाकृष्ण मंदिरात धार्मिक वातावरणात वसुबारस सोहळा; फटाक्यांची आतषबाजी आणि मिरवणुकीने उत्साहात भर
फोंडाघाट :
दिवाळी सणाचा शुभारंभ मानल्या जाणाऱ्या वसुबारसचा उत्सव फोंडाघाट येथील श्री राधाकृष्ण मंदिरात आज सायंकाळी ७ वाजता मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी गाय आणि वासरांचे विधिवत पूजन केले. महिलांनी गाय-वासरांना गोडधोड खाऊ घातले. त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून, पायांच्या खुरांना स्पर्श करत नमस्कार केला आणि डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत आशीर्वाद घेतले. या पारंपरिक पूजनातून गोमातेप्रती असलेली श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यानंतर गाय-वासरांची मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांच्या आतषबाजीने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या सोहळ्यामुळे फोंडाघाटमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू झाल्याची प्रचिती आली.
या कार्यक्रमाला अजित नाडकर्णी, बाळा वळंजू, सचिन तायशेटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने साजऱ्या झालेल्या या वसुबारस उत्सवाने परिसरात आनंद आणि भक्तिमय वातावरण निर्माण केले.
