You are currently viewing पिंगुळी पाझर तलावाला हात लावू देणार नाही! आमदार निलेश राणेंची ग्रामस्थांना ठाम ग्वाही
Oplus_16908288

पिंगुळी पाझर तलावाला हात लावू देणार नाही! आमदार निलेश राणेंची ग्रामस्थांना ठाम ग्वाही

मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत डेव्हलपरला गावात कामबंदी; तलावाचे आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे संरक्षण करण्याची ग्वाही

कुडाळ : पिंगुळी पाझर तलावाच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी पिंगुळी ग्रामपंचायतीत ग्रामस्थांशी थेट संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. ग्रामस्थांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघेपर्यंत संबंधित डेव्हलपरला गावात एकही काम करू देणार नाही. गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे रक्षण करण्यासाठी मी सर्वांत पुढे उभा राहीन, अशी ठाम ग्वाही आमदार राणे यांनी दिली.

यावेळी बोलताना आमदार राणे म्हणाले की, पाझर तलावाला हात लावला जाऊ नये, तलावाकडे जाणारी पायवाट बंद होऊ नये आणि पाणी प्रदूषित होऊ नये, या ग्रामस्थांच्या मागण्या रास्त आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि कुडाळच्या तहसीलदारांशी चर्चा झाली असून, मागण्या मार्गी लागेपर्यंत काम थांबविण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. गावाच्या हिताच्या विरोधात कोणाचीही मनमानी खपवून घेतली जाणार नाही, तसेच ग्रामस्थांवर कोणत्याही प्रकारची दमदाटी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

या विषयावरून विरोधकांवर निशाणा साधताना आमदार राणे म्हणाले की, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांना दोन वेळा बैठकीसाठी बोलावूनही ते आले नाहीत. आंदोलनाची वेळ येण्यापूर्वीच हा प्रश्न चर्चेने सुटू शकला असता; परंतु आता या विषयाचे राजकीय भांडवल केले जात आहे. काही माजी लोकप्रतिनिधी प्रश्नांपेक्षा राजकीय श्रेयाला अधिक महत्त्व देत असल्याचा आरोप त्यांनी केला. गावामध्ये फूट पाडणाऱ्यांना ओळखून सर्वांनी पिंगुळीच्या हितासाठी एकसंध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमात सरपंच अजय आकेरकर यांनी गावातील रस्त्यांची दुरवस्था, वाढत्या लोकसंख्येसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना आणि नवीन ग्रामपंचायत इमारतीसाठी निधीची मागणी आमदारांकडे मांडली. तर ग्रामस्थांच्या वतीने व्यंकू पांगुळ यांनी पाझर तलावालगतचा प्रस्तावित प्रकल्प पूर्णपणे रद्द करण्याची मागणी लावून धरली. आकेरकर यांनी उपस्थित केलेल्या बांधासंबंधीच्या प्रश्नांसह इतर प्रस्तावांना पाठिंबा देऊन डिसेंबरनंतर विकासकामांच्या भूमिपूजनासाठी पुन्हा पिंगुळीत येईन, अशी ग्वाही आमदार राणे यांनी दिली.

याप्रसंगी व्यासपीठावर सरपंच अजय आकेरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, सभापती मिलिंद नाईक, कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील, संजय आंग्रे, आनंद शिरोडकर, संजीव परब आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा