कॅरम आणि बुद्धिबळमध्ये उल्लेखनीय कामगिरी; वयाच्या चौदाव्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावले उपविजेतेपद
सावंतवाडी : क्रीडा क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीची गुणवान खेळाडू साक्षी रामदूरकर हिने पुन्हा एकदा आपल्या कौशल्याची छाप उमटवली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने ओरोस येथे आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत साक्षीची सतरा वर्षांखालील वयोगटात विभागस्तरीय स्पर्धेसाठी विक्रमी पाचव्यांदा निवड झाली आहे. दहावीत शिक्षण घेत असलेल्या साक्षीने अभ्यासासोबतच कॅरम आणि बुद्धिबळ या दोन्ही खेळांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले आहे.
मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कॅरम व बुद्धिबळ प्रशिक्षक श्री. कौस्तुभ पेडणेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षीने हे यश संपादन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनासोबतच साक्षीने घेतलेली अथक मेहनत आणि परिश्रम यामुळे तिला राज्यस्तरीय शालेय स्पर्धा तसेच असोसिएशनच्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवता आले आहे. पेडणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी साक्षीने सतरा वर्षांखालील गटात राज्यस्तरीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते.
विशेष म्हणजे, सलग पाच वर्षे कॅरम आणि बुद्धिबळ या दोन्ही खेळांमध्ये विभागस्तरावर निवड होणारी साक्षी रामदूरकर ही राज्यातील एकमेव खेळाडू ठरली आहे. तिच्या या दैदीप्यमान कामगिरीमुळे मुक्ताई ॲकेडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
साक्षीने आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय श्री. कौस्तुभ पेडणेकर सर आणि मुक्ताई ॲकेडमीला दिले आहे. गेल्या दहा वर्षांत श्री. कौस्तुभ पेडणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली तीन मुलींची राष्ट्रीय स्तरावर, तर सोळा मुला-मुलींची राज्यस्तरावर निवड झाली आहे.
साक्षी ही गुणी आणि प्रतिभावान खेळाडू असून तिचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे मत पेडणेकर सरांनी व्यक्त केले. मुक्ताई ॲकेडमीच्या सचिव सौ. स्नेहा पेडणेकर आणि कोषाध्यक्ष बाळकृष्ण पेडणेकर यांनी साक्षीचे अभिनंदन करून तिला पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. साक्षीच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे.
