*जागतिक साकव्य विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*
*दैनिक हिंदुस्थानचा दीपोत्सव २०२६ साहित्याचा सृजनमेळा*
*दीप से दीप जलाते चलो…*
स्व. कै. बाळासाहेब मराठे या स्वातंत्र्यसंग्राम सैनिकाने १९५० साली सुरू केलेल्या दै. हिंदुस्थानने आता ७७ व्या वर्षातील गौरवशाली वाटचालीला सुरुवात केली आहे. त्यांच्या पश्चात सुपुत्र कै. अरुण मराठे यांनी अनेक अडचणींना तोंड देत या वृत्तपत्राची धुरा समर्थपणे सांभाळली. आज प्रबंध संपादक श्री. विलास अरुण मराठे आणि संपादक श्री. उल्हास मराठे ही परंपरा समर्थपणे पुढे नेत आहेत. मराठे कुटुंबाने या दैनिकाला केवळ वृत्तपत्र न मानता कुटुंबाचा अविभाज्य सदस्य म्हणून जपले आहे.
या प्रवासात कै. प्रभाताईंचे योगदान विशेष स्मरणीय आहे. दैनिकाची ज्योत अखंड तेवत राहावी यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. माणसे जोडली, मने जुळविली आणि नाती जपली. संस्था उभी करणे महत्त्वाचे असतेच; पण ती माणसांच्या विश्वासावर टिकवून ठेवणे अधिक मोठे असते, हे त्यांनी सिद्ध केले.
दै. हिंदुस्थानचे वेगळेपण म्हणजे त्याची स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारिता. कोणत्याही राजकीय पक्षाची पाठराखण न करता सर्वांशी मैत्रीचे संबंध जपत, सत्ताधाऱ्यांना आवश्यक तेथे प्रश्न विचारण्याची भूमिका या दैनिकाने कायम ठेवली आहे. स्वतःचे विचार आणि वैशिष्ट्य जपणारे संपादकीय, समाजातील ज्वलंत प्रश्नांवर केलेले मार्मिक भाष्य हे या दैनिकाचे बलस्थान आहे.
पश्चिम विदर्भातील एकमेव दैनिक म्हणून अद्ययावत बातम्या, विश्वासार्ह माहिती आणि वाचकांच्या आवडीचे विषय यांचा समतोल साधण्यात दैनिक यशस्वी झाले आहे. विशेष म्हणजे नवोदितांपासून प्रस्थापित लेखकांपर्यंत अनेक लिहित्या हातांना प्रोत्साहन देणारे हे हक्काचे व्यासपीठ आहे. आपले सगळे जीवन मराठे परिवाराने दैनिक हिंदुस्थानला वाहून घेतलेले आहे, मनुष्य म्हटला की त्याला वैयक्तिक सुखदुःखे असणारच, तशी या परिवाराला ही असणारच, तरीही त्याचा यत्किंचितही परिणाम दै हिंदुस्थानवर झालेला दिसत नाही,
की घेतले न हे व्रत आम्ही अंधतेने या उक्तीप्रमाणे दैनिक हिन्दुस्थानसाठी त्यांनी आपले जीवन वाहून घेतले आहे,
प्रबंध संपादक श्री. विलास मराठे यांची पत्रकारितेतील वाटचालही उल्लेखनीय आहे. इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (INS) राष्ट्रीय कार्यकारिणीवर तब्बल २४ वेळा नियुक्ती होणे आणि नुकतीच लघु व मध्यम वृत्तपत्र समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड होणे, ही त्यांच्या कार्याची महत्त्वपूर्ण पावती आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांचे सातत्याने प्रसिद्ध होणारे समाजजागृतीपर लेख विशेष भावतात. जणू एखादा जवळचा मित्र आपल्याशी संवाद साधत आहे, असा त्यांच्या लेखनातील आपलेपणा असतो. इतक्या व्यापातून ते लेखनासाठी वेळ कसा काढतात, याचे मनापासून कौतुक वाटते.
या वृत्तपत्राशी माझेही नाते विशेष जिव्हाळ्याचे आहे. माझ्या लेखणीतील विचार, भावना आणि अनुभव यांना सातत्याने प्रसिद्धी देत दै. हिंदुस्थानने मला व्यक्त होण्याचे हक्काचे व्यासपीठ दिले. ही माझ्यासाठी आनंदाची आणि कृतज्ञतेची बाब आहे.
यंदाचा ‘दीपोत्सव २०२६’ हा दिवाळी विशेषांक धनत्रयोदशीच्या मंगल मुहूर्तावर विदर्भाची कुलस्वामिनी श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवीच्या चरणी अरूण करून आयोजित प्रकाशन सोहळ्यात वाचकांच्या भेटीला येत आहे, ही आनंददायी पर्वणी! या दीपोत्सव अंकाला आतापर्यंतराज्यस्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, सुप्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका आणि विचारवंत डॉ. निशिगंधा वाड यांचे अतिथी संपादक म्हणून लाभलेले मार्गदर्शन अंकाच्या साहित्यिक आणि वैचारिक समृद्धीत निश्चितच मोलाची भर घालेल.
दै. हिंदुस्थानची ही ज्ञानज्योत अशीच अखंड तेवत राहो, नवे लेखक घडवो, नवे विचार रुजवो आणि वाचकांच्या मनात विश्वासाचे स्थान अधिक दृढ करो. या देदीप्यमान वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रतिभा पिटके
अमरावती
