मियासाब पीर दर्ग्यासमोरील अपघातप्रकरणी गोपाळ गावडे यांना जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर
अॅड. परशुराम चव्हाण यांच्या युक्तिवादानंतर एक लाख रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्ततेचे आदेश
सावंतवाडी :
कुडाळ-सावंतवाडी मार्गावरील मियासाब पीर दर्ग्यासमोर २४ जुलै २०२६ रोजी रात्री झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले चौकुळ-नेनेवाडी येथील गोपाळ सुरेश गावडे यांना ओरोस येथील मे. जिल्हा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. एक लाख रुपयांच्या जामीन रकमेवर त्यांची मुक्तता करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
२४ जुलै रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास कुडाळ-सावंतवाडी मार्गावरील मियासाब पीर दर्ग्यासमोर स्विफ्ट कार (क्र. MH-07-AG-7801) आणि रॉयल एनफिल्ड दुचाकी (क्र. GA-03-AB-7501) यांच्यात अपघात झाला होता. या अपघातात दुचाकीवरील कार्तिक अरविंद परब (वय २१, रा. सालईवाडा, सावंतवाडी) आणि आयुषी अमित देसाई (वय १७, रा. सावंतवाडी) हे दोघे जखमी झाले होते. त्यापैकी आयुषी देसाई हिचा मृत्यू झाला होता.
या अपघातास कारणीभूत ठरून वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेल्याची फिर्याद सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासात गोपाळ सुरेश गावडे यांचे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्यांना आरोपी करण्यात आले. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०५, २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४, १८४ व १८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अटक केल्यानंतर आरोपीला सावंतवाडी येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आरोपीच्या वतीने विधिज्ञ अॅड. परशुराम बाबुराव चव्हाण यांनी ओरोस येथील मे. जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल करून युक्तिवाद केला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला एक लाख रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
जामिनाच्या अटींनुसार आरोपीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रकारचे प्रलोभन, धमकी अथवा आश्वासन देऊन खटल्यातील पुराव्यांमध्ये छेडछाड करू नये, न्यायालयात नियमित हजर राहावे, पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू नये, तसेच स्वतःचे आणि दोन नातेवाईकांचे पत्त्याचे पुरावे व संपर्क क्रमांक सादर करावेत, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. पत्त्यात बदल झाल्यास तपास अधिकाऱ्यांना त्याची माहिती देणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
आरोपीतर्फे अॅड. परशुराम बाबुराव चव्हाण आणि अॅड. शुभेश सुरेश वंजीवाले यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.
