भटक्या कुत्र्यांची उर्वरित ५० टक्के नसबंदी करा, अन्यथा उच्च न्यायालयात जाणार!
जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांचा सावंतवाडी नगरपालिकेला इशारा; मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना वकिलामार्फत नोटीस बजावणार
सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील भटक्या कुत्र्यांची नसबंदी मोहीम अर्धवट राहिली असून, यापूर्वी ५० टक्के कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली होती. मात्र, उर्वरित ५० टक्के कुत्र्यांची नसबंदी अद्याप झालेली नाही. ही मोहीम तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेकडे केली आहे. वारंवार मागणी करूनही कार्यवाही न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
यापूर्वी मसुरकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन उर्वरित कुत्र्यांची नसबंदी करण्याची मागणी केली होती. दिवाळीच्या काळात ही मोहीम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झालेली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुरुवार, १८ जून रोजी पुन्हा नगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
आठ दिवसांत मोहीम सुरू न झाल्यास न्यायालयात दाद मागणार
सर्वोच्च न्यायालयाच्या भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीविषयक आदेशाची अंमलबजावणी न झाल्याचा आरोप करत, नगरपालिकेने आठ दिवसांत नसबंदी मोहीम सुरू न केल्यास वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना ८० सेक्शनअंतर्गत १५ दिवसांची नोटीस देऊन त्यानंतर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे मसुरकर यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात नगरविकास विभागाच्या सचिवांकडेही पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
भटक्या कुत्र्यांमुळे शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कुत्र्यांच्या चाव्यामुळे नागरिकांना रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन्स घ्यावी लागतात. रस्त्यावर अचानक कुत्रे आडवे आल्याने अपघात होऊन वाहनचालक गंभीर जखमी होण्याच्या घटनाही घडतात. रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे नागरिकांची झोपमोड होत असून, ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे मसुरकर यांनी नमूद केले.
नसबंदीमुळे भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे उर्वरित कुत्र्यांची नसबंदी मोहीम तातडीने पूर्ण करावी, अशी त्यांची मागणी आहे.
नसबंदीनंतर कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी
नसबंदी झालेल्या भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी वनखात्याच्या जमिनीवर स्वतंत्र शेड उभारून सौर कुंपण, पाणी आणि खाद्याची व्यवस्था शासनाने करावी, अशी मागणीही मसुरकर यांनी केली आहे. यासाठी सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी ठराव मंजूर करून तो मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांकडे पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्रातील इतर नगरपालिका तसेच ग्रामपंचायतींनीही याबाबत ठराव करून भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर योग्य उपाययोजना करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, असे मत जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी व्यक्त केले.
