सावंतवाडीच्या ‘क्षितिज इव्हेंट’चा राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत डंका!
‘संगीत वीज म्हणाली धरतीला’ नाटकाला पाच वैयक्तिक पारितोषिके; आशिष शेलार यांच्या हस्ते कलाकार व तंत्रज्ञांचा गौरव
सावंतवाडी
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीसह २२ वी बालनाट्य स्पर्धा, ७ वी दिव्यांग बालनाट्य स्पर्धा आणि प्रथम महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीचा ‘नाट्यगौरव’ राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. या सोहळ्यात सावंतवाडीच्या ‘क्षितिज इव्हेंट’ संस्थेने सादर केलेल्या ‘संगीत वीज म्हणाली धरतीला’ या नाटकाने तब्बल पाच वैयक्तिक पारितोषिके पटकावत सावंतवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
महाराष्ट्राच्या समृद्ध नाट्यपरंपरेचा वारसा पुढे नेणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत क्षितिज इव्हेंट, सावंतवाडी निर्मित या नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञांनी आपल्या कसदार अभिनयासह नेपथ्य, वेशभूषा, प्रकाशयोजना आणि रंगभूषेतील कौशल्याच्या जोरावर परीक्षकांची व रसिकांची मने जिंकली.
या नाटकासाठी आज्ञा कोयंडे यांना अभिनयाचे रौप्य पदक प्रदान करण्यात आले. बाळ पुराणिक (दत्तात्रय पुराणिक) यांनी नेपथ्य विभागात द्वितीय पारितोषिक मिळविले. वैभवी पुराणिक यांना वेशभूषेसाठी द्वितीय, अभिषेक कोयंडे यांना प्रकाशयोजनेसाठी तृतीय, तर संजय जोशी यांना उत्कृष्ट रंगभूषेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा जानेवारी २०२६ मध्ये संपन्न झाली होती.
मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे सोमवार, २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी झालेल्या या सोहळ्यात राज्याचे सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते विजेत्या कलाकार व तंत्रज्ञांना सन्मानित करण्यात आले. पुढील वर्षापासून संगीत एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणाही मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी केली.
या सोहळ्याला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांच्यासह नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गज, नामवंत कलाकार आणि रंगकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यस्तरीय व्यासपीठावर मिळालेल्या या घवघवीत यशामुळे क्षितिज इव्हेंटच्या कलाकार व तंत्रज्ञांचे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदन होत आहे. या यशाने सावंतवाडीच्या नाट्य चळवळीला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे.
