You are currently viewing आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अजित दिघे यांची *’दिल्ली वॉरियर टीम लीडर – 2026′ म्हणून निवड

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अजित दिघे यांची *’दिल्ली वॉरियर टीम लीडर – 2026′ म्हणून निवड

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अजित दिघे यांची ‘दिल्ली वॉरियर टीम लीडर – 2026’ म्हणून निवड

वैभववाडी

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘करिअर कट्टा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी येथील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. अजित दिघे यांची ‘दिल्ली वॉरियर टीम लीडर – 2026’ म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘नजरेत राष्ट्र व हृदयात महाराष्ट्र’ हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातून दरवर्षी एका पुरुष प्राध्यापकाची आणि एका महिला प्राध्यापकाची निवड केली जाते. या निवड प्रक्रियेतून डॉ. दिघे यांना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची बहुमानाची संधी मिळाली आहे.

या दिल्ली दौऱ्यामध्ये विविध राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक आणि उद्योजकीय उपक्रमांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. या दौऱ्यात स्टार्टअप उपक्रमांचे परीक्षण करून नवउद्योजकांच्या संकल्पना, व्यवसाय विकासाच्या संधी, नावीन्यपूर्ण संशोधन, तंत्रज्ञानाचा वापर आणि उद्योजकतेच्या विविध मॉडेल्सचा अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच स्टार्टअप क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक आणि मार्गदर्शक यांच्याशी संवाद साधून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची मानसिकता विकसित करण्यासाठी उपयुक्त माहिती मिळविण्यावर भर राहणार आहे.

याशिवाय दिल्ली विधान भवनाला भेट देऊन विधिमंडळाची कार्यपद्धती, लोकशाही व्यवस्था, कायदे निर्मितीची प्रक्रिया आणि लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्यांचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या भेटीद्वारे भारतीय न्यायव्यवस्था, संविधानिक मूल्ये, न्यायदान प्रक्रिया आणि न्यायपालिकेची भूमिका समजून घेता येणार आहे. राष्ट्रपती भवनाच्या भेटीतून देशाची सर्वोच्च घटनात्मक संस्था, राष्ट्रपतींचे अधिकार व कार्यपद्धती तसेच भारतीय लोकशाहीच्या गौरवशाली परंपरेची माहिती मिळणार आहे.

25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीमध्ये होणाऱ्या या दौऱ्याच्या माध्यमातून राष्ट्रीय नेतृत्व, प्रशासकीय कार्यक्षमता, निर्णयक्षमता, संघटन कौशल्य, संवादकौशल्य आणि सामाजिक बांधिलकी या गुणांचा विकास करण्यावर विशेष भर असेल. तसेच देशाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचे अनुभव जाणून घेणे, महाराष्ट्रातील शैक्षणिक व उद्योजकीय संधींची राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन मिळविणे, हे या दौऱ्याचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे.

डॉ. दिघे यांनी महाविद्यालयात अध्यापनाबरोबरच संशोधन, विद्यार्थी विकास, करिअर मार्गदर्शन, उद्योजकता आणि सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक व राज्यस्तरीय करिअर संसद समिती सदस्य आणि महाराष्ट्र शासनाचा मधुरक्रांती या आणि अशा अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या या निवडीमुळे वैभववाडी तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राची मान उंचावली आहे. दिल्ली दौऱ्यात मिळणारा अनुभव ते भविष्यात महाविद्यालयातील विद्यार्थी आणि युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगात आणतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

डॉ. अजित दिघे यांच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा