You are currently viewing लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा शानदार पदग्रहण सोहळा संपन्न

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा शानदार पदग्रहण सोहळा संपन्न

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा शानदार पदग्रहण सोहळा संपन्न

वेदिका विशाल परब यांच्या हस्ते पदग्रहण; महिलांच्या सक्षमीकरणासह सामाजिक सेवेसाठी विविध उपक्रम राबविणार

वेंगुर्ले

महिलांचे संघटन, सक्षमीकरण आणि सामाजिक विकास यांना प्राधान्य देत महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत होणाऱ्या लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्लाच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. वेदिका विशाल परब यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ पार पडला.

यावेळी वेदिका विशाल परब यांनी आपल्या मनोगतात महिलांनी एकमेकींना सहकार्य करून पुढे जाण्याची गरज व्यक्त केली. महिलांमध्ये अनेक कला, कौशल्ये आणि क्षमता असतात. त्यांना योग्य व्यासपीठ व प्रोत्साहन मिळाल्यास त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. महिलांनी केवळ स्वतःच्या प्रगतीपुरते मर्यादित न राहता इतर महिलांनाही सोबत घेऊन सामाजिक कार्यात योगदान द्यावे. सेवाभावी वृत्ती, एकजूट आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून फाउंडेशनने समाजात सकारात्मक बदल घडवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या फाउंडेशनच्या अध्यक्षपदी सौ. ज्योती देसाई, सचिवपदी सौ. वृंदा गवंडळकर, खजिनदारपदी डॉ. दिपाली देसाई यांची निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून काजल गिरप, सौ. आकांक्षा परब, दिपाली अभ्यंकर आणि सौ. शुभदा नवार यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला.

फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी कौशल्य विकास व रोजगाराभिमुख प्रशिक्षण, महिला बचतगटांना प्रोत्साहन, महिला उद्योजिकांना व्यवसायासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, स्थानिक महिला उद्योजिकांच्या उत्पादनांची प्रदर्शने व विक्री आयोजित करणे, महिलांसाठी आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिरे, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मदत, गुणवंत व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान तसेच महिला व मुलींसाठी शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

याशिवाय पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान, सामाजिक प्रबोधन आणि आपत्तीच्या काळात मदतकार्य अशा समाजोपयोगी उपक्रमांतही फाउंडेशन सक्रिय सहभाग घेणार आहे. महिलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविणे, स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि महिलांच्या माध्यमातून समाजविकासाला हातभार लावणे, हे फाउंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.

महिलांनी महिलांसाठी एकत्र येत सामाजिक कार्याची जबाबदारी स्वीकारण्याच्या या उपक्रमामुळे वेंगुर्ल्याच्या सामाजिक क्षेत्रात महिलांच्या नेतृत्वाला नवी दिशा मिळणार असून, सेवाकार्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा