You are currently viewing

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातील शासकीय पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळीतील स्थानिक ग्रामस्थांनी आजपासून कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाठींबा दिला असून कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक व माजी आमदार परशुराम उपरकर हे उपोषणात सहभागी झाले होते.

यावेळी वैभव नाईक म्हणाले.सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक जमिनी परप्रातींयांनी खरेदी केल्या असून ते परप्रांतीय लोक स्थानिकांवर दादागिरी करीत आहेत. याआधी सासोली, दाभोली आणि आता पिंगुळी मध्ये हा प्रकार सुरु आहे. पिंगुळीतील शासकीय पाझर तलावाच्या बाजूला परप्रातींय व्यक्तीने जमीन घेऊन पाझर तलावाकडे जाणारा रस्ता दादागिरी करून आणि बॉडीगार्ड नेमून बंद केला आहे. त्या जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प उभारला जाणार असून या प्रकल्पाचे सांडपाणी थेट तलावात मिसळले जाणार असल्याने पाणी दूषित होणार आहे.त्याविरोधात पिंगुळीतील सर्व स्थानिक ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. मात्र या प्रकरणात गेले वर्षभर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कुडाळचे आमदार एक चकार शब्द काढायला तयार नाहीत. काही लोकांनी आम्हाला सांगितले कि सत्ताधाऱ्यांची त्या परप्रांतिय जमीन मालकासोबत पार्टनरशिप आहे. म्हणूनच त्या परप्रांतीयाला सर्व प्रकारच्या परवानग्या ताबडतोब मिळाल्या. परंतु पिंगुळी ग्रामस्थांचे आंदोलन आम्ही तडीस लावल्याशिवाय आणि त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असे वैभव नाईक यांनी ठणकावून सांगितले.

माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले, पिंगुळी गावातील शासकीय पाझर तलावाच्या ठिकणी परप्रांतीय व्यक्तीने गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू करून तेथील पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे. तेथील तलाव स्वमालकीचे दाखवून त्याची जाहिरात करून प्लॉट विक्री केली जात आहे. १८५० नळधारक ग्रामस्थ या तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.मात्र या गृहनिर्माण प्रकल्पातील सांडपाणी थेट तलावात मिसळले जाणार असल्याने त्या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा असलेला मुख्य स्त्रोत प्रदूषित होणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी वनराई बंधारे बांधून फोटोसेशन करत आहेत आणि दुसरीकडे पिंगुळी गावात उपलब्ध असलेले पाणी वाचविण्यासाठी ग्रामस्थांना उपोषण करावे लागते यावरून पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कामात किती विसंगती आहे हे दिसून येते. परंतु आपल्याला शांत बसायचे नाही पिंगुळी ग्रामस्थांना न्याय मिळाला नाही तर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगतिले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, राजन नाईक, तालुकासंघटक बबन बोभाटे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट,विजय प्रभू, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर, जि.प.सदस्य रुपेश पावसकर, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब,शहरप्रमुख संतोष शिरसाट,अतुल बंगे, पं.स.सदस्या ममता राऊळ, माजी सरपंच नीलिमा पालकर, नीलिमा वालावलकर, सचिन ठाकूर, तुळशीदास पिंगुळकर, हेमंत पिंगुळकर, बंटी परुळेकर, संजय वेतोरेकर,बाबल गावडे, दीपक गावडे,कपिल म्हापसेकर, केतन शिरोडकर, शोहेब खुल्ली, मिलिंद परब, दीपक राऊळ, मानसी पेडणेकर, नूतन गावडे, अंकिता जाधव, ऐय्याज खुल्ली, आदेश धुरी, चेतन राऊळ, चेतन राणे, अंकु पांगुळ आदींसह पिंगुळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा