*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित मिसळ पुराण*
*मिसळ*
मिसळ पण एक अजब रसायन आहे.
कशातही काहीही मिसळलं तरी ती मिसळ होत नाही
आणि कशात काहीही मिसळलंच नाही तरीही ती मिसळ होत नाही.
नुसत्या उसळीवर फरसाण टाकलं की झालं का हो?
नुसत्या फरसाणाने थोडंच चालतंय व्हय?
बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर नको?
अन ती बारकी दह्याची वाटी?
बारीक शेव?
तळलेला पापड?
एक्सट्रा ची तर्री वाटी विथ नो एक्सट्रा चार्जेस?
लिंबाची फोड?
नको?
कधी कधी साबुदाणा खिचडी तर कधी उकडलेले बटाटे कुस्करून नको?
आणि त्यात थोडे पोहे काही अल्लगच कॉम्बिनेशन ना राव.
ट्राय करा एकदा.
(आजकाल काही नतद्रष्ट मंडळी मिसळी बरोबर
एक गुलाबजाम किंवा एक सोनपापडी देतात,
कधी कधी तर जिलेबीची दोन वेटोळे ही देतात)
मिसळीचंही एक शास्र असतं.
उगाच नाही आजकाल चुलीवरच्या मिसळीला राजाश्रय मिळाला!
मातीचा लेप लावून कल्हई लावलेल्या पातेल्यात चुलीवर दिलेली जिवंत फोडणी,
अहा! काय भन्नाट कल्पना आहे राव !
त्यातून ती मटकी गावठी नंदुरबार ची असावी.
(चवळी वापरणे म्हणजे मिसळीचा घोर अपमान बरं का
आणि असा अपमान उडुपी हॉटेलात राजरोस होत असतो)
लालभडक वर तरंगणारी तर्री.
तिला नुसतं बघूनच, हात खिशातला रुमाल काढायला सरसावणार .
तसंही, मिसळ उत्तम बनवण्याची एक साधना असते
आणि उत्तम मिसळ तर साधनाची असतेच असते
मग ती चौक मंडईतून अंबड लिंक रोडवर गेली तरीही.
अगदीच तसही नाही हं!
ती ,प्रत्येक घासागणिक नाक पुसायला लावणारी लोकमान्य ची
म्हणजे आपल्या भाषेत हमालाची मिसळ काय कमी हाय व्हय?
अन, शामसुंदर ची?
क्या कहेने?प्रत्येक टेबलावरचे पेपर नॅपकिन्स क्षणांत संपतात ना राव …!
कितीही आणि कोणी ही काही ही म्हणो, मिसळ होती ती भगवंतरावचीच!
काय म्हणता ट्राय नाही केली?
कसे करणार?
अगदी फुल्ल फॉर्ममध्ये असतांना जगद्विख्यात बॅट्समन ने
प्रथम श्रेणी क्रिकेट मधून निवृत्ती घ्यावी तशी निवृत्ती घेतली होती ह्या मिसळींनं.
आणि मिसळीत आदर्श कसे असावे तेही दाखवलं होतं.
असो,गेले ते दिन गेले.
मिसळी बरोबर पाव ही संकल्पना आली आणि मिसळ उदरभरणा चे साधन झाले.
आणि मुहूर्त तरी काय हो?
दुपारी बारा/ एक वाजता?
धत्त तेरे की !
ही का वेळ असते मिसळीला न्याय देण्याची?
नाश्त्याचे पदार्थ जेवणाला?
आजही मॉर्निंग वॊक ला निघालेल्यांना खेचून घ्यायची ताकद
फक्त आणि फक्त मिसळीतच आहे.
आजही सातपुरला उपजीविकेसाठी निघालेल्या सायकली वळतात
त्या आपल्या आपल्या मिसळीच्या ठेल्यांवरच ना ?
पाण्यावरून युद्ध होतील, अशी काही विधाने काही दिवसांपूर्वी ऐकली होती,
आज आम्ही म्हणतो तीच आमची मिसळ कशी सर्व श्रेष्ठ,
या वरुन युद्ध होतांना समाज माध्यमातून पहात आहे.
अर्थात वरील सर्व विचार हे माझे स्वतः चे आहेत.
आणि त्यांचेशी मी एकनिष्ठ आहे उगाच युद्ध बिद्ध नको हं!
पटलं तर घ्या नाही तर राहू द्या ना राव !
मिसळ ही एक संस्कृती आहे!
मिसळ हे एक आन्हिक आहे !
मिसळ हा एक अभिमान आहे!
मिसळ खा मिसळ ल्येको!
ते ही विथ नो पाव हं !
—–राजा जोशी 9823687519
〰️〰️😁😁〰️〰️
