युवराज लखमराजे भोंसले, नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांची TEDxIBS Pune मध्ये विचारमांडणी!
‘Beyond Boundaries’ संकल्पनेतून मांडला सावंतवाडीचा प्रवास; सांस्कृतिक वारसा जपण्यासह शहराच्या सर्वांगीण विकासाचा घेतला वेध
सावंतवाडी : संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले व सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराणी श्रद्धाराजे भोंसले यांना नुकतेच पुणे येथे आयोजित TEDxIBS Pune या प्रतिष्ठित व्यासपीठावर आपले विचार मांडण्याची संधी मिळाली. यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना ‘Beyond Boundaries’ अशी होती. या जागतिक स्तरावरील व्यासपीठावर त्यांनी सावंतवाडीचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा, शहराच्या विकासाचा प्रवास आणि भविष्यातील संकल्पना मांडल्या.
TED हे जगातील सर्वाधिक ओळखल्या जाणाऱ्या व्यासपीठांपैकी एक असून, येथे विविध क्षेत्रांतील विचारवंत, उद्योजक, नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती आणि समाजात सकारात्मक बदल घडवणारे लोक आपले विचार, अनुभव आणि जीवनप्रवास मांडतात.
TEDx हे TED च्या अधिकृत परवानगीने स्वतंत्रपणे आयोजित केले जाणारे व्यासपीठ असून, अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेरणादायी विचार आणि कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविल्या जातात.
या व्यासपीठावर युवराज लखमराजे भोंसले व युवराणी श्रद्धाराजे भोंसले यांनी सावंतवाडीतील आपला प्रवास मांडला. एका ऐतिहासिक राजवाड्याचे बुटीक आर्ट हॉटेलमध्ये रूपांतर करण्यापासून ते या शहराचा समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची आपली जबाबदारी याविषयी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
तसेच सावंतवाडीचा वारसा जपणे, येथील पारंपरिक कला आणि हस्तकलेला प्रोत्साहन देणे, स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, महिला आणि तरुणांना सक्षम करणे तसेच शहराच्या सर्वांगीण विकासात अर्थपूर्ण योगदान देणे, या आपल्या प्रयत्नांबद्दलही त्यांनी सविस्तर विचार मांडले.
सावंतवाडी पॅलेस उभारणे म्हणजे केवळ एक हॉटेल किंवा व्यवसाय उभारणे नव्हे, तर आपल्या शहराला आणि इथल्या लोकांना काहीतरी परत देण्याचा तो एक प्रयत्न होता. आपली मुळे जिथे रुजलेली आहेत, त्या भूमीप्रती आपली काही जबाबदारी असते, असा आपला ठाम विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडीने प्रगती करावी, समृद्ध व्हावे आणि तिची खरी ओळख जगभर पोहोचावी, हीच आपली इच्छा असल्याचे मत सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराणी श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केले.
तर आपला हा प्रवास आणि सावंतवाडीविषयीचे विचार TEDx सारख्या जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या व्यासपीठावर मांडता आले, ही आमच्यासाठी विशेष आनंदाची बाब आहे. सावंतवाडीसारख्या आपल्या शहराची गोष्ट भौगोलिक सीमा ओलांडून एका मोठ्या व्यासपीठावर पोहोचवण्याची ही एक अनोखी संधी होती, अशी भावना युवराज लखमराजे भोंसले यांनी व्यक्त केली.
सावंतवाडीचा इतिहास, परंपरा, कला आणि सांस्कृतिक वैभव जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या दृष्टीने TEDxIBS Pune मधील ही विचारमांडणी महत्त्वपूर्ण ठरली आहे. सावंतवाडीच्या ऐतिहासिक वारशाला आधुनिक विकासाची जोड देत शहराची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे या निमित्ताने विशेष महत्त्व अधोरेखित झाले आहे.
