माणुसकीच्या स्नेहभेटीतून दिव्यांग बांधवांची दिवाळी होणार गोड!
कुडाळ येथे ३ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय मेळावा; दृष्टिबाधितांना पांढऱ्या काठ्यांचे व दिवाळी भेटवस्तूंचे वाटप
कुडाळ :
जागतिक पांढरी काठी दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कासाल, महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सिंधुदुर्ग आणि लायन्स क्लब कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांसाठी जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात दृष्टिबाधित दिव्यांग बांधवांना पांढऱ्या काठ्यांचे वाटप करण्यात येणार असून, दिवाळीनिमित्त भेटवस्तू देऊन त्यांच्या आनंदात भर घालण्यात येणार आहे. दृष्टिबाधित व्यक्तींना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
हा मेळावा मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता पंचायत समिती सभागृह, कुडाळ येथे होणार आहे.
सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन साईकृपा संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : अनिल शिंगाडे (संस्था अध्यक्ष) – ९७६५९७९४५०
