You are currently viewing बेळगावच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकरची रेटिंग कॅटेगरीत बाजी!
Oplus_16908288

बेळगावच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकरची रेटिंग कॅटेगरीत बाजी!

साडेसहा गुणांसह प्रथम क्रमांक; १० हजार रुपये रोख पारितोषिकासह मेडल व प्रशस्तीपत्राने गौरव

सावंतवाडी : बेळगाव, कर्नाटक येथे लायन्स क्लब आणि लिओ क्लब यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकर याने दमदार कामगिरी करत रेटिंग कॅटेगरीत प्रथम क्रमांक पटकावला. सात लाख २५ हजार रुपये पारितोषिके असलेल्या या स्पर्धेत भारतातील विविध राज्यांतील सुमारे ३३० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुक्ताई ॲकेडमीचे आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर आणि चिदानंद रेडकर यांच्यासह प्रज्वल नार्वेकर व स्वरुप राऊळ या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

 

बाळकृष्णला या स्पर्धेत दोन हजारांपेक्षा अधिक रेटिंग असलेले चार प्रतिस्पर्धी मिळाले. त्यापैकी आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे आणि फिडे मास्टर निरंजन नवलगुंद यांच्याविरुद्ध त्याने चांगली लढत दिली. तसेच आंतरराष्ट्रीय मास्टर निखिल दीक्षित याच्याविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला, तर केवल निर्गुण याचा पराभव केला.

यापूर्वी मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बाळकृष्णने आंतरराष्ट्रीय महिला मास्टर पर्णाली धारीया हिचा पराभव करण्याचा पराक्रम केला होता. एका आंतरराष्ट्रीय मास्टरविरुद्ध डाव बरोबरीत सोडवणारा आणि एका आंतरराष्ट्रीय मास्टरचा पराभव करणारा बाळकृष्ण हा कोकणातील पहिला खेळाडू ठरला आहे.

या स्पर्धेत बाळकृष्णने नऊ राऊंड्सपैकी सहा राऊंड्स जिंकले, तर एक राऊंड बरोबरीत सोडवून एकूण साडेसहा गुणांची कमाई केली. या कामगिरीच्या जोरावर त्याने रेटिंग कॅटेगरीत प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय त्याने ३८ रेटिंग पॉईंट्स मिळवले. या यशाबद्दल त्याला १० हजार रुपये रोख पारितोषिक, आकर्षक मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या अन्य खेळाडूंनीही उल्लेखनीय कामगिरी केली. तेरा वर्षीय स्वरुप राऊळ याने दोन आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंवर विजय मिळवत पाच गुणांची कमाई केली. तेरा वर्षीय चिदानंद रेडकर याने चार गुण, तर नऊ वर्षीय प्रज्वल नार्वेकर याने तीन गुण मिळवले.

ब्लिट्झ रेटिंग स्पर्धेत बाळकृष्णने सहा, चिदानंदने पाच, तर प्रज्वल आणि स्वरुप यांनी प्रत्येकी चार गुण मिळवले. या स्पर्धेत चिदानंद, प्रज्वल आणि स्वरुप यांनी ब्लिट्झ रेटिंगही मिळवले.

मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर आणि सरचिटणीस स्नेहा पेडणेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बाळकृष्णसह मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा