सांगली / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :
मेरा युवा भारत सांगली (युवा कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार) यांच्या वतीने विकसित भारत युवा संसद 2026 सांगली जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन बुधवार दिनांक 4 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रुरल डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन राजवाडा चौक, सांगली येथे केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिनांक 2 नोव्हेंबर 2026 पूर्वी माय भारत पोर्टल वरती ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन मेरा युवा भारत, सांगली चे उपसंचालक राहुल डोंगरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
मेरा युवा भारत सांगली व भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रुरल डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन राजवाडा चौक, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेकरिता 18 ते 25 हा वयोगट आहे (वयाची गणना 17 ऑगस्ट 2026 रोजी). स्पर्धा पूर्णतः निशुल्क आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेचा विषय एक राष्ट्र एक निवडणूक असा आहे. स्पर्धकास हा विषय मराठी हिंदी व इंग्रजी भाषेतून मांडता येईल. स्पर्धकाचा सादरीकरणाचा कालावधी 3 मिनिटे असेल.
सर्वोत्कृष्ट जिल्हास्तरीय तीन विजेत्यांना पुढील राज्यस्तरीय फेरीसाठी महाराष्ट्र विधानसभा येथे सहभागी होण्याची संधी मिळेल व राज्यस्तरीय तीन विजेत्यांना संसद भवन नवी दिल्ली येथे सहभागी होण्याची संधी मिळेल. विकसित भारत युवा संसद जिल्हास्तरीय स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 9970823930 व 9970022047 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
