You are currently viewing टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी 6 नोव्हेंबर रोजी डाक पेन्शन अदालत

टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी 6 नोव्हेंबर रोजी डाक पेन्शन अदालत

टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी 6 नोव्हेंबर रोजी डाक पेन्शन अदालत

तक्रारी 3 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

        सिंधुदुर्ग

टपाल विभागातील निवृत्तिवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनविषयक तक्रारींच्या निवारणासाठी अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग यांच्या कार्यालयात शुक्रवार, दि. 6 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता डाक पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.

टपाल विभागातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या तसेच सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनविषयक लाभांशी संबंधित तक्रारींचा या अदालतीमध्ये विचार करण्यात येणार आहे. विशेषतः ज्या प्रकरणांचे निराकरण तीन महिन्यांच्या आत झालेले नाही, अशा प्रलंबित तक्रारींचा विचार करण्यात येईल.

पेन्शन अदालतमध्ये वारसा प्रमाणपत्र, वेतनश्रेणी वाढ, धोरणात्मक बाबी, शिस्तभंगविषयक प्रकरणे, विभागीय पदोन्नती समितीच्या (डीपीसी) निर्णयांचे पुनरावलोकन तसेच धोरणात्मक स्वरूपाच्या इतर बाबींशी संबंधित तक्रारींचा विचार केला जाणार नाही.

संबंधित निवृत्तिवेतनधारकांनी आपली तक्रार वैयक्तिक स्वरूपात, विहित नमुन्यात तीन प्रतींमध्ये  नंदकुमार कुरळपकर, अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी – 416812 या पत्त्यावर दि. 3 नोव्हेंबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावी. एकत्रित स्वरूपातील अथवा इतरांच्या वतीने सादर केलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. तसेच, दि. 3 नोव्हेंबर 2026 नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा पेन्शन अदालतीमध्ये विचार केला जाणार नाही.

डाक पेन्शन अदालत अर्जासाठी आवश्यक तपशील

अर्जामध्ये निवृत्तिवेतनधारकाचे किंवा कुटुंब निवृत्तिवेतनधारकाचे नाव व निवृत्तीच्या वेळी अथवा मृत्यूच्या वेळी असलेले पदनाम, संबंधित कार्यालयाचे नाव, निवृत्तीची तारीख, पीपीओ क्रमांक, निवृत्तिवेतन घेत असलेल्या पोस्ट ऑफिसचे नाव, संपूर्ण टपाल पत्ता व दूरध्वनी क्रमांक, तक्रारीचा थोडक्यात तपशील तसेच अर्जदाराची स्वाक्षरी व दिनांक नमूद करावा. आवश्यक असल्यास तक्रारीच्या सविस्तर तपशिलासह स्वतंत्र अर्ज जोडावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा