सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाकडून कचरा संकलनासाठी २ नवीन घंटागाड्या दाखल; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याहस्ते लोकार्पण
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता व्यवस्थापन अधिक गतिमान, शिस्तबद्ध व प्रभावी करण्यासाठी प्राधिकरणाकडून २ नवीन अद्ययावत घंटागाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. या नवीन घंटागाड्यांचे लोकार्पण तृप्ती धोडमिसे अध्यक्ष, सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, तहसीलदार चैताली सावंत उपस्थित होते.
प्राधिकरण क्षेत्रात जमा होणाऱ्या कचऱ्याचे वेळेत, नियमित व शास्त्रोक्त पद्धतीने संकलन करता यावे, या मुख्य उद्देशाने या घंटागाड्या खरेदी करण्यात आलेल्या आहेत आहेत. या नवीन घंटागाड्यांमध्ये ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष / सुविधेची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांकडून कचऱ्याचे उगमस्थानीच वर्गीकरण करून तो संकलित करणे शक्य होणार आहे.
प्राधिकरण क्षेत्रातील सर्व नागरिक, व्यावसायिक व आस्थापनांकडून दररोजचा कचरा गोळा करणे अधिक सोपे, सुटसुटीत व प्रभावी होईल. दररोज संकलित केलेला ओला व सुका कचरा थेट कचरा डेपोपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवणे शक्य होणार आहे. कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट लागल्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्गनगरी परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यास मोठी मदत होईल.
प्राधिकरण मधील सर्व नागरिकांना आपल्या घरातील व दुकानातील ओला व सुका कचरा नेहमी वेगळा ठेवूनच घंटागाडीत द्यावा आणि प्राधिकरण परिसर स्वच्छ राखण्यास सक्रिय सहभाग नोंदवून सिंधुदुर्गनगरी स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे असे आवाहन श्रीमती तृप्ती धोडमिसे (मा. अध्यक्ष, सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग) यांनी केले आहे.