साधारण वीस दिवसापूर्वी महाराष्ट्राचे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मा. श्री विकास खारगे आय ए एस यांचा फोन आला. फोनवर त्यांनी निमंत्रण दिले. सोमवार दि. 26 ऑक्टोबर 2026 ही तारीख त्यांचे चिरंजीव व सोशल मीडियावर सहा मिलियन चाहते असणारे श्री मनीष आणि आश् ना यांच्या लग्नानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीला त्यांच्या स्वतःच्या गावी आयोजित स्वागत समारंभासाठी राखून ठेवण्यास सांगितले. पत्रिका पाठवित असल्याचे सांगितले. मला अर्थातच आनंद झाला. एवढ्या मोठ्या व्यक्तीने स्वतः फोन करून आपल्या चिरंजीवांच्या लग्नाचे स्वागत समारंभाचे निमंत्रण देणे म्हणजे आगळे वेगळेच काम.
चिरंजीव मनीष यांच्या लग्नाची पत्रिका आली. आणि मला धक्का बसला. एकदम साधीसुधी पत्रिका. कुठलाही बडेजाव नाही. नाहीतर आजकाल पत्रिकेवरच प्रचंड खर्च केला जातो. लग्नाची तर गोष्ट सोडा. पत्रिकेमध्ये सर्व मजकूर लिहिला होता. सर्वात खाली श्री विकास खारगे यांचे नाव लिहिले होते .नावासमोर आयएएस लिहिलेले नव्हते. तसेच अपर मुख्य सचिव महसूल असे पण लिहिलेले नव्हते. पत्रिकेत फक्त साहेबांचे नाव मीनाक्षी वहिनींचे व्यंकटेश ॲलिया व नील अशी पाचच नाव होती. पत्रिकेत मोजून 57 शब्द होते. महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या मुलाची लग्नाची स्वागत समारंभाची पत्रिका इतकी साधी असू शकते याच्यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही.
साहेब इचलकरंजीचे. साहेबांचा माझा पंचवीस वर्षापासूनचा ऋणानुबंध. मी या स्वागत सोहळ्याचे निमित्त साधले. या विवाह स्वागत सोहळ्यानिमित्त आपण इचलकरंजी कोल्हापूर व सांगली परिसरात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आठ-दहा दिवस घेऊ असा संकल्प सोडला. त्याप्रमाणे सांगलीचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व माझे मित्र श्री विशाल नरवाडे व सांगली महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती संजीता महापात्र यांना फोन केले. आमच्या काही मित्रांवर नियोजनाची जबाबदारी दिली. सांगलीचे महाराष्ट्रातील पहिले खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय दादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालय. बारस्कर अकादमी व ऑफिसर क्लब येथे कार्यक्रमाचे नियोजन केले.
मनीष सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. सहा मिलियन त्याचे चाहते आहेत. त्याचे एक एक मिनिटाचे व्हिडिओ मनाला भिडून जातात. त्याचा लग्नाच्या स्वागत समारंभ साहेबांनी आपल्या मूळ गावी म्हणजे इचलकरंजीला ठेवून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. ज्या गावात आपला जन्म झाला .ज्या गावात आपण लहानाचे मोठे झालो .त्या गावाचे ऋण ते विसरले नाहीत. इचलकरंजीच्या इतक्या लोकांनी मुंबईला यावे त्यापेक्षा नवरदेव नवरींनीच इचलकरंजीला यावे व लोकांचे आशीर्वाद घ्यावेत ही खारगे साहेबांची कल्पना खरोखरच हृदयस्पर्शी आहे. इचलकरंजीच्या नातेवाईकांना व मित्रांना त्यांनी एक चांगली सोय इचलकरंजीला स्वागत समारंभ आयोजित करून करून दिली.
दोन दिवसांपूर्वी परत माझ्या व्हाट्सअप वर स्वागत समारंभाचे स्मरण म्हणून साहेबांचा निरोप आला. त्याबरोबर त्यांनी पत्रिकाही रिपीट केली. किती हे नियोजन. काल दिनांक 26 ऑक्टोबरला हा स्वागत समारंभ इचलकरंजीला पार पडला. समारंभाची वेळ साडेसातची होती. कार्यक्रमाला विलंब होणार असे लक्षात येताच साहेबांनी सायंकाळी व्हाट्सअपवर सर्वांना मेसेज पाठविला. साडेआठ वाजता आपण यावे असा तो निरोप होता. येणाऱ्या पाहुण्यांची एवढी काळजी घेणारा हा माणूस खरोखरच प्रत्येकाच्या हृदयात त्याचमुळे जाऊन बसला आहे.
श्री विकास खारगे यांनी आपल्या इचलकरंजीला स्वागत समारंभ आयोजित करून पत्रिकेवर कुठल्याही प्रकारचा बडेजाव न करता आयएएस अपर मुख्य सचिव याचा उल्लेख न करता समाजासमोर एक आदर्श ठेवलेला आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी म्हणतात ती यालाच.
इचलकरंजीच्या लोकांना किती आनंद झाला असेल तो शब्दात व्यक्त करणे अशक्यच आहे. शब्दातीत आहे. महात्मा गांधींनी गावाकडे चला हा संदेश दिला होता. तो संदेश काही अंशी तरी अमलात आणण्याचा श्री विकास खारगे यांचा हा प्रयत्न निश्चितच समाजाला दिशा देणारा आहे. श्री विकास खारगे यांना
जितनेवाले कोई अलग काम नही करते
वेळ हर काम अलग ढंग से करते है
या ओळी तंतोतंत लागू होतात.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
