‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियानांतर्गत उद्या २५ रोजी कुडाळमध्ये काँग्रेसची पत्रकार परिषद
कोकण प्रभारी आमदार सौ. सौम्या रेड्डी यांच्या उपस्थितीत दुपारी १२.३० वाजता आयोजन; ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावर होणार चर्चा
कुडाळ :
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून देशभरात ‘व्होट चोरी’ या मुद्द्यावर पत्रकार परिषद आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. याच अभियानांतर्गत रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. ‘मत वाचवा – देश वाचवा’ या अभियानांतर्गत होणाऱ्या या पत्रकार परिषदेसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेल्या कोकण प्रभारी आमदार सौ. सौम्या रेड्डी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
ही पत्रकार परिषद कुडाळ एमआयडीसी येथील रेस्ट हाऊसमध्ये दुपारी १२.३० वाजता होणार आहे. यावेळी ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावर भूमिका मांडण्यात येणार असून, काँग्रेसच्या आगामी कार्यक्रमांबाबतही चर्चा होणार आहे.
या पत्रकार परिषदेसाठी जिल्ह्यातील प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, प्रांतिक सदस्य तसेच महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल, ओबीसी, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती-जमाती, इंटक, पर्यावरण, विचार विभाग आदी सेल व विभागांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद नामदेव मोंडकर यांनी केले आहे.
आमदार सौ. सौम्या रेड्डी यांचा दौरा असा : रविवारी सकाळी ११.४० वाजता चिपी विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्या कुडाळकडे रवाना होतील. दुपारी १२.३० ते १ वाजेपर्यंत एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषद होईल. त्यानंतर १.१० ते १.३० या वेळेत रामलीला मैदानावरील सभेसंदर्भात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे.
दुपारी २ वाजता त्या कणकवलीकडे रवाना होतील. २.३० वाजता गोपुरी आश्रम येथे पटवर्धन गुरुजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर २.३५ वाजता रत्नागिरीकडे प्रस्थान करतील. दुपारी ३ वाजता खारेपाटण येथे रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष जमीर खलिपे यांच्या उपस्थितीत स्वागत झाल्यानंतर त्या रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कार्यालयातील बैठकीसाठी रवाना होतील.
