*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ अवनी आदित्य जोशी (दारशेतकर) लिखित अप्रतिम लेख*
*”अखंड वाहते सरिता”*
नदी वाहते अखंड
वाहण्यात ना खंड
अमूल्य जल प्रचंड
कार्य तिचे उदंड
नदी अविरत वाहत राहून सर्वानाच जल मिळवून देते. ती जात, पात, धर्म, पंथ असा कोणताही भेद करत नाही. आपले अखंडरूपी वाहण्याचे कार्य ती सदा सुरू ठेवते. आणि आपल्या जलाने सर्व मानव, निसर्ग, प्राणीमात्रांना पाणी देऊन त्यांचा जीव शांत करते.
आपल्या रक्तातही पाण्याचा अंश असतो. पाणी ही फार महत्वाची गरज आहे. ती गरज नदीच्या पाण्याच्या रुपात भागवली जाते. तिच्या उगमापासून ते बाल, तरुण, वृद्ध होण्याच्या सर्व अवस्थेत ती सुख दुःख अनुभवत अखंड प्रवाही राहण्याचे कार्य आपणास शिकवते.
कधी ती रौद्र रूप धारण करते. पूर, महापूर येतात. पण याला कारणीभूत मानवाचा निसर्गातील हस्तक्षेप असतो. नदीचे पाणी अडवून धरणे बांधली जातात. तेव्हा वाहती नदी अडवून तिला रोखले जाते. कधी तिचा वाहता मार्ग मानवी विकासासाठी हवा तसा बदलला जातो. मग तिचे कार्य मंदावते किंवा कधी ती अति प्रवाही होते. पण हे कोण जाणते?
हिंदू संस्कृतीमध्ये नदीस देवता मानले जाते. तिची पूजा केली जाते. पण या पूजेचे भक्तिभावाचे अति प्रमाण वाढूनच आज “गंगा स्नान” कुंभमेळा, यातून अनेक नद्या अशुद्ध होत आहेत. असा भक्तिभाव असे वर्तन मानवाचे नसावे. त्याने वेळीच नदीचे महत्व जाणून शहाणे व्हावे.
सागरात ती मिसळते
प्रेम सरितेचे फार
विसरुनी स्वतः स
सांगे समर्पण अपार
नदी ही देखील एक स्त्रीचेच रुप आहे. नदी सर्व अवस्थेतून वाहत राहून शेवटी सागरात समाविष्ट होते. ती आपली मर्यादा सांभाळून जीवन कार्य पूर्ण करून नंतर सागराच्या जलरूपी अंतरंगात सामावते. ती निस्सीम प्रेम समर्पण शिकवते.
म्हणून मानवाने नदीच्या पाण्याचा लाभ घ्यावा. आपली तृषा भागवावी. मनातून तिला वंदन करावे. आणि तिचे संरक्षण, संगोपन करावे.
सदा प्रवाही रहावे
कधी न थांबावे
कार्य करत जावे
परी सागरास मिळावे.
सौ. अवनी आदित्य जोशी.(दारशेतकर)
तळेगांव दाभाडे.
जि. पुणे.
