बीडच्या गोविंदवाडी तलावाला भेट; दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांच्या व्यथा जाणून घेतल्या
बीड : बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या मच्छीमारांना राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी मदतीची ग्वाही दिली आहे. गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी तलावाला भेट देऊन त्यांनी तेथील परिस्थितीची पाहणी केली तसेच मच्छीमारांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी एका वयोवृद्ध आजीने मंत्री नितेश राणे यांचा हात धरत मदतीची आर्त विनंती केली. आजीची व्यथा ऐकताच नितेश राणे यांनी आपुलकीने त्यांना धीर दिला. ‘तुम्ही हात धरू नका, मी तुमचा नातू आहे. आता मदत मी करणार,’ असे आश्वासक शब्द देत त्यांनी आजीला मदतीची ग्वाही दिली. या प्रसंगातून मच्छीमारांप्रती असलेली त्यांची आपुलकी दिसून आली.
दुष्काळी परिस्थितीमुळे मच्छीमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तलावातील पाण्याची परिस्थिती आणि त्याचा मच्छीमारी व्यवसायावर होणारा परिणाम यामुळे मच्छीमार अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत मंत्री नितेश राणे यांनी थेट तलावावर जाऊन मच्छीमारांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला.
केवळ मंत्रालयात बसून आढावा न घेता, मच्छीमारांच्या उपजीविकेशी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या या भूमिकेमुळे मच्छीमारांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर दुष्काळग्रस्त मच्छीमारांना नेमकी कोणती मदत मिळणार आणि त्यांच्या अडचणी कशा दूर होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
