*जागतिक साकव्य विकास मंच तथा गझल प्राविण्य समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शोभा वागळे लिखित गझलसंग्रह परीक्षण*
*दीवान_ए_शरयू*
✒️गझलकार: डॉ शरयू शहा, मुंबई
🖊️परीक्षण: शोभा वागळे, पुणे
*^^^^^^^^^^^^^^^*
ज्येष्ठ गझलकारा डॉ. शरयू शहा यांचा ‘दीवान_ए_शरयू’ हा गझल संग्रह आणि इतर सात गझल संग्रह दिनांक १७ मे २०२६ ला नवी मुंबई येथे प्रकाशित करण्यात आले.
डॉ.शरयू शहा यांचे कौतुक करावे तितके थोडेच !
त्यांचे अकरावीच्या शिक्षणानंतर लग्न झाले. सुखाचा संसार व तीन मुलांचे संगोपन केल्यानंतर, तब्बल तेरा वर्षांनी त्यांनी आपले अपुरे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला. सतत २१ वर्षे त्यांनी स्वतःला शिक्षणासाठी झोकून दिले आणि त्यातून त्यांनी मराठी विषय आणि सितार वादनामध्ये एम.ए. अशा पदव्या मिळवल्या. तसेच ‘मराठी संगीत नाट्यपदांतून दिसणारे श्रीकृष्णाचे स्वरूप’ ह्यावर प्रबंध लिहून PhD ही प्राप्त केली.
त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी स्वतःची वेगवेगळ्या विषयांवरची, म्हणजे कथा, कविता, लघु लेख, अध्यात्मिक लेख, एकाच अक्षराने सुरूवात होणारे काव्य प्रकार व गझला अशी २३ पुस्तके प्रकाशित केली. त्यातील काहीत त्यांना पुरस्कारही लाभले आहेत.
त्यांच्यामध्ये लपलेल्या अनेक कलागुणांचे एका नंतर एक दर्शन होऊ लागले. हस्तकला, केस, नखे, उंदरांच्या लेंड्या व अशा अनेक टाकावू वस्तूंपासून सुंदर कलाकृती करून त्यांनी अनेक प्रदर्शने भरवली. आ. सुशीलकुमार शिंदे ह्यांनीसुध्दा त्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले होते.
ताईंनी बऱ्याच ठिकाणी त्यांच्या हस्तकला कौशल्याच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यांची व्याख्याने रेडिओ व टि.व्ही.वर ही प्रसारीत झाली आहेत.
त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे, ज्यांची यादी खूपच मोठी आहे. आपण त्यांच्या गझल संग्रह व दीवानचे वाचन केले तर गझलेच्या शेरांमधून त्यांची अनुभूती येईलच.
ताईचा ‘दीवान_ए_शरयू’ हा मुरद्दफ गझलांचा संग्रह मराठी साहित्यातील दीवानमध्ये नवव्या क्रमांकाचा आहे. गेल्याच आठवड्यात मी आ. उर्मिला बांदिवडेकर यांच्या दीवानच्या समीक्षणामध्ये डॉ. शरयूताईच्या दीवानचाही उल्लेख केला होता. आ.माई आणि ताई यांच्यात गुरू शिष्याचे नाते जरी असले तरी दोघींची घनिष्ठ मैत्री आहे. ‘गझल उर्मिला’ व ‘गझल चांदणे’ हे आपले पहिले वहिले गझल संग्रह दोघींनी एकत्र प्रकाशित केले होते. तसेच आता माईचे अकरा गझल संग्रह व एक दीवान_ए_उर्मिला तसेच डॉ. शरयू ताईंचे सात गझल संग्रह व एक दीवान_ए_शरयू हे एकाच वेळी ‘बाजीगर’ प्रकाशनाने नवी मुंबई येथे १७ मे २०२६ ला प्रकाशित केले. माझे भाग्यच समजते की माई व ताईंनी त्यांचे सर्वच्या सर्व संग्रह व दीवान मला भेट स्वरूपात पाठवले.
‘गझल उर्मिला’ व ‘गझल चांदणे’ या दोन्ही संग्रहांचे मी अगोदर समीक्षण केले होते. आ. माईच्या दीवानचे ही करून झाले आणि आज शरयूताईंच्या दीवानचे करत आहे.
सगळेच संग्रह प्राप्त झाल्याने समीक्षकाच्या दृष्टीने त्यांचे वाचन करण्यासही बराच अवधी लागला. प्रत्येक संगहात लिहिलेली मान्यवरांची प्रस्तावने वाचून प्रत्येक मान्यवरांचे – संग्रह पडताळण्याचे कौशल्य कळले. तसेच आ. माई आणि शरयूताई दोघी मैत्रिणी असल्या तरी गझला, त्यांचे प्रकार व खयाल वेगवेगळ्या धर्तीचे आहेत हे समजते.
दीवान ही मूळ उर्दू संकल्पना असून त्यामध्ये केवळ मुरद्दफ गझलांचा समावेश असतो.
मराठी देवनागरी वर्णमालेतील ऊ आणि ई या दोन स्वराखेरीज ३५ व्यंजनांनी संपणारे मराठी शब्द आहेत. म्हणजेच दीवानमध्ये अशा रदिफाची (अंत्य यमक) किमान एक याप्रमाणे ३७ गझला असणे आवश्यक असते.
माई व सिराज सरांसारखेच शरयूताईंच्या सुद्धा ३७ मुळाक्षरांच्या प्रत्येकी ६ अशा एकूण २२२ गझला असून त्यामध्ये अक्षरगणवृत्तातील १४९ व मात्रा वृत्तातील ७३ गझला आहेत. ताईंनी ८६ अक्षरगण वृत्ते व १८ मात्रा वृत्ते, मिळून १०४ वृत्ते हाताळली आहेत.
प्रत्येक गझलेवर वृत्ताचे नाव, लगावली व मात्रांची संख्या नमूद केली आहे.
ताईंनी लघु गुरूची सूट घेतली आहे. आठ संग्रहातील कोणत्याच गझलेची दीवानमध्ये पुनरावृत्ती झालेली नाही.
या दीवानात २८ वैशिष्ट्यपूर्ण गझलांचा समावेश आहे. त्या म्हणजे १ मतलाबंद, १ त्रिदल काफिया, ११ आरंभकाफिया आणि १५ जुलकाफियाच्या आहेत.
ताईच्या दीवान बद्दल सांगायचे म्हणजे, यातील बऱ्याच गझला स्त्री जीवनावर भाष्य करणाऱ्या आहेत. स्त्रीला देवाने घडवतानाच तिच्या अंगी सहनशीलता, कारुण्य, ममता व संवेदनशील मन भरलेले आहे. तरी आजच्या काळातली स्त्री ही शिक्षित असून तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांना, त्रासांना किंवा टोमणे मारणाऱ्यांचा, मग ते स्त्रीच्या संसारात असो अथवा समाजात.. प्रतिकार करून ती सहज आपले प्रश्न सोडवते.
डॉ. शरयू यांचा परिचय वाचून हे कळले की त्यांचे लहान वयात लग्न झाले आणि तेरा वर्षांनी त्यांनी तीन मुलांचे संगोपन करून पुढील शिक्षणाची वाटचाल केली. संसारात असलेल्या स्त्रीला सांसारिक जबाबदाऱ्या पार करून पदव्या मिळवणे ही साधी सोपी गोष्ट नाही. ह्या सगळ्या अडचणींवर ताईंनी मात केली. ती कशी केली ते त्यांच्या बऱ्याच शेरांतून अनुभवता येते. शरयूताईंचे शेर हे फक्त त्यांचे जीवनातले नसून समाजातील असंख्य स्त्रियांना लागू पडतात. प्रत्येक वाचणाऱ्या स्त्रीला वाटेल की हा शेर माझ्यावरच लिहिला आहे. अवश्य दीवान वाचून प्रत्यय घ्यावा.
डॉ.शरयूताईंनी, दीवानात २८ वैशिष्ट्यपूर्ण गझला लिहिल्या आहेत त्या पहिल्यांदा पाहू या.
*१ ‘मतलाबंद’ गझल* पान(४४)
पान ४४ वर धरित्री वृत्ताच्या “सुवास बाई” या शीर्षकाच्या गझलेत सगळेच शेर म्हणजे सगळे मतलेच आहेत.
*जगा मिळेल छानसा सुवास बाई*
*अशी फुले खुडायची कशास बाई*
*करून घेत राहतेस त्रास बाई*
*सदा करत रहायचा विकास बाई*
*१ त्रिदल काफिया गझल* (१२४)
पान १२४ वर ‘उषा’ वृत्तातली “तिरस्कार” शीर्षकाची ही त्रिदल काफिया गझल म्हणजे सतत तीन तीन काफिया घेऊन केलेली गझल अतिशय अवघड असते पण ताईची गझल वाचल्यावर सोपीच वाटते!
*मनातून काढावा तिरस्कार यापुढे*
*सुखावून सांगावा नको भार यापुढे*
*उदासीन का व्हावे पराधीनता नको*
*कलेतून भेटावा अविष्कार यापुढे*
*डॉ. ताईच्या १५ ‘जुलकाफिया’ गझला आहेत. उदाहरणे बघू या.*
*असता ज्वलंत इच्छा परिपूर्णतेस येते*
*मिळवायचे यशाला नसते कुणी अभागी* (पान ७०)
*दाखवले अन् लगेच ठरले लगीन छोटेपणी*
*प्रेम समजणे जमले नाही आता भुलुनी बघू* (पान ७१)
*११ आरंभकाफिया गझला आहेत*
गझलेची सुरूवातच काफियाने होते ती ‘आरंभ काफिया’गझल असते.
*हासणे जमलेच ना ही खंत माझी*
*नाचणे जमलेच ना ही खंत माझी*
*त्रस्त केले या मनाला टोमण्यानी*
*टोकणे जमलेच ना ही खंत माझी* (पान १००)
*नको जायला पोर वायाच*
*मुलाला पहावे अता नीट* (पान १०५)
डॉ.ताईनी स्वतःचे अर्धवट राहिलेले शिक्षण संसारात रममाण होऊन तीन मुले झाल्यानंतर पूर्ण केले. संसारात असलेल्या स्त्रीला सांसारिक जबाबदाऱ्या असतात व त्यात मुलांचे संगोपन ही करायचे ! नुसत्या विचारांनीच जीवाची घालमेल होत आहे तर डॉ. ताईने सगळा व्याप सांभाळून कसे बरे शिक्षण पूर्ण करून त्या ‘ट्रिपल ग्रॅज्युएट’ झाल्या ?
हे त्यांच्या गझलेच्या शेरांतून वाचकांना अनुभवता येते. उदाहरणार्थ काही शेर वाचू या.
*मायचे काळीज अवघे गुंतले पोरांमधे हे*
*पोरकेपण का तरी या प्राक्तनाला सांग भाऊ* (पान ५०)
*एक सारखा सभोवताल शिकवितो*
*अनुभवामधून या शिकायला नको* (पान ५५)
*चांगल्या कामात विघ्ने लाख वेळा येत जाती*
*निश्चयाने मात्र शरयू संपतो गुंता मनाचा* (पान ७९)
*देव पाठीशी असे मग कोठले भय*
*धर्मकार्यी भारलेला जन्म माझा* (पान ९५)
*अताच्या सासवा भारी सुनांचे लाड करणाऱ्या*
*बदलतो काळ हे कळणे जगाची रीत ही आहे* (पान २३८)
*कोणीही नसते परिपूर्ण इथे पुढे जायचे थेट*
*आपले बनव तू विश्व खुबीने राहू नकोस अज्ञ*
*संबंधित अपुले की ते परके कळते ना कोणास*
*बघ सूज्ञपणाने अन् निगुतीने राहू नकोस अज्ञ* (पान २५४)
ताईंनी दीवानात २८ वैशिष्ट्यपूर्ण गझला लिहिल्या आहेत. तरी अजून वेगळ्या विशिष्ट गझला वाचनात आल्या. त्या म्हणजे
पान ६४ सौदामिनी वृत्तातली “सुखाला सदा साठवावे” ह्या गझलेतला प्रत्येक शब्द ‘स’ च्या बाराखडीनेच लिहिलेला आहे.
*सुरांची सुबत्ता सदा सोबती*
*सुखद स्वर सदाची सुचावे सखे*
पान ६४
मुरजयी वृत्ताची गझल “जिंकत जीवन जगू”
*जिंकत जिंकत जीवन जगू*
*जळमट जाळत जीवन जगू*
पान ६६
गझलेतला प्रत्येक शब्द एकच बाराखडीने लिहून अर्थपूर्ण जबरदस्त शेर लिहिण्याचे कसब फक्त डॉ. शरयूताईंकडेच असावे असे मला वाटते. ताईचे शब्दभांडार अफाट आहे. एकदा माईंने सांगितले होते गझल कार्यशाळेत – एक लाखांवर लगावलीचे शब्द लिहिणारी त्यांची एकमेव शिष्या म्हणजे डॉ. शरयूताई. म्हणूनच ताईंनी वरील प्रकारच्या गझला सलग, सुबक रीतीने लिहिलेल्या असाव्यात असे मला वाटते.
अशा अनमोल अनुभवांच्या खजिन्याने भरलेला दीवान_ए_शरयू हा फक्त एक गझल संग्रहच नसून स्त्री जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रत्येक स्त्रीच्या जीवनात आलेले आणि येत असणारे सुख-दु:खाचे क्षण, नात्यातल्या आपुलकीचे, प्रेमाचे, शांत, अशांततेचे, राग रुसव्याचे, वैभव संपन्नतेचे, ऐश आरामाचे, ऐकोप्याचे, जीवन साफल्याचे अनुभव कथित करणारे आणि संदेश देणारे आहेत. मनाला भिडणाऱ्या गझलांचा हा संग्रह अवश्य वाचावा.
ताईंनी आपली लेखणी अशीच प्रवाही ठेवावी आणि मराठी साहित्यात उत्तमोत्तम साहित्याची भर घालावी अशी सदिच्छा👍👍
दीवान_ए_शरयू …
गझलकारा डॉ. शरयू शहा
प्रस्तावना… डॉ.शेख इक्बाल मिन्ने
(अध्यक्ष : विश्व गझ़ल परिषद)
पाठराखण : डॉ. अविनाश सांगोलेकर
(आद्य मराठी गझल संशोधक आणि ज्येष्ठ गझलकार)
प्रकाशन: बाजीगर प्रकाशन
प्रकाशक: सिराज करीम शिकलगार
(कवी,लेखक आणि गझलकार)
*पुस्तक समीक्षण*
शोभा वागळे
पुणे.
८८५०४६६७१७
