You are currently viewing सिंधुदुर्गातील जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनाना मिळणार ‘sindhudurg.ai’ ची साथ 

सिंधुदुर्गातील जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनाना मिळणार ‘sindhudurg.ai’ ची साथ 

सॉफ्टलॅब्स ग्रुपच्या AI-आधारित वेबसाईटचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

पारंपरिक जल व्यवस्थापनाला आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेची मिळणार जोड

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळाच्या व पाणी टंचाई समस्येवर मात करून जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजना राबविण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत होणार आहे. गावागावांतील पारंपरिक जलव्यवस्थापनाच्या पद्धती, स्थानिक जलस्रोत आणि उपलब्ध माहिती यांचे संकलन करून त्याला कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) जोड देणाऱ्या ‘sindhudurg.ai’ या अत्याधुनिक वेबसाईटचा शुभारंभ सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला.

सॉफ्टलॅब्स ग्रुपच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला असून, ग्रामीण विकासाला तंत्रज्ञानाची जोड देत गावांना स्वयंपूर्ण बनविण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

सॉफ्टलॅब्स ग्रुपच्या मालवण येथील कार्यालय मध्ये पत्रकार परिषद माध्यमातून मुख्यकार्यकारी अधिकारी मिथिलेश बांदिवडेकर, मुख्यविपनन अधिकारी मकरंद पाटकर, विजय केनवडेकर यांनी sindhudurg.ai वेबसाईटची माहिती दिली. वेबसाईटच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिक फायदा शेतकरी जनतेला होण्याच्या दृष्टीने काही मार्गदर्शनपर सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी केल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये पिढ्यान्‌पिढ्या जतन झालेल्या पारंपरिक पाणी व्यवस्थापनाच्या पद्धती, जलसंधारणाचे स्थानिक उपाय आणि गावांशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती या वेबसाईटच्या माध्यमातून संकलित केली जाणार आहे. या माहितीचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपयोग करून गावांच्या गरजांनुसार जलव्यवस्थापन आणि विकासाच्या उपाययोजनांना दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भुजल पातळी तपासणी, जल साठे व पाणी उपलब्धता यां दृष्टीने माहिती मिळवण्यात फायदा होणार आहे.

स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले ज्ञान आणि आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता यांची सांगड घालून पाण्याच्या समस्येवर दीर्घकालीन उपाय शोधण्यास या उपक्रमाची मदत होऊ शकते. त्यामुळे जलसंधारणाच्या नियोजनाला अधिक माहितीपूर्ण आणि परिणामकारक बनविण्याच्या दृष्टीने या वेबसाईटला महत्त्व प्राप्त झाले आहे.

गावांचा सर्वांगीण विकास साधणे, जलसंधारणाच्या माध्यमातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करणे आणि ग्रामीण भागाला नवीन तंत्रज्ञानाशी जोडणे, ही या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्टे आहेत. त्याचबरोबर शासन आणि गाव यांच्यात समन्वय साधणारे डिजिटल व्यासपीठ म्हणूनही ही वेबसाईट काम करणार आहे.

गावागावांतील माहिती एकत्रित उपलब्ध झाल्यास स्थानिक गरजा समजून घेणे, पारंपरिक उपाययोजनांचे दस्तऐवजीकरण करणे आणि विकासाच्या संभाव्य मार्गांचा शोध घेणे अधिक सुलभ होऊ शकते. या माध्यमातून गावांच्या विकासप्रक्रियेत स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढविण्यावरही भर देण्यात आला आहे.

‘आपल्या गावाची माहिती आपणच उपलब्ध करून द्यायची आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गावाच्या विकासाला चालना द्यायची,’ ही या उपक्रमाची मुख्य संकल्पना आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील नागरिकांनी आपल्या गावाची अधिकाधिक उपयुक्त माहिती या वेबसाईटवर उपलब्ध करून देत या प्रयत्नात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘आता आपलं गाव होणार स्वयंपूर्ण!’ या संकल्पनेतून सुरू झालेला ‘sindhudurg.ai’ हा उपक्रम पारंपरिक ज्ञान, स्थानिक सहभाग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनांना चालना देत सिंधुदुर्गच्या समृद्ध भविष्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या दिशेने या उपक्रमाकडे आशादायी पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा